पाणलाेट क्षेत्रामुळे पर्यावरणाचा समताेल राखला जाताे -किन्हीतील शिबिरात पर्यावरणतज्ज्ञ विजय काेळी यांचा सल्ला ;

भुसावळ : पाणलोट क्षेत्रामुळे संपूर्ण क्षेत्राचा विकास साधता येतो, क्षेत्र उत्पादनक्षम होऊन उत्पादनात वाढ होते. आर्थिक विकास साधता येतो. पाणलोट क्षेत्रामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर फायदा घेता येतो. पाणलोटक्षेत्रामुळे मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होताे, अशी माहिती पर्यावरणतज्ज्ञ विजय काेळी यांनी दिली.
भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा याेजना विभाग ‘प्लस टू’चे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर किन्ही येथील सर्वाेदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सुरू आहे. त्यात ‘हसत खेळत गिरवला पाणलाेटचे धडे’ या विषयावर विजय काेळी यांनी स्वयंसेविकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून तशी प्रात्यक्षिके करून घेतली. त्यात पाणलाेट कार्यक्रमाचे महत्व विषद केले. स्वयंसेवकांनी विचारलेल्या शंकाचे निरसनही केले. विविध खेळांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, जल, जंगल, जमीन यांचे महत्त्व, वैयक्तिक शोष खड्ड्यांचे महत्व आदी विषयांवर त्यांनी विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वयंसेविका मनाली कुलकर्णी होती. वैष्णवी नाले, ॠतुजा हरणे, वैष्णवी भालेराव यांनी लक्ष्य गीत सादर केले. सुत्रसंचलन व परिचय जान्हवी बाणाईते हीने तर आभार दिपाली सोनवणेने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. एच. पाटील, प्रा. श्वेता नागला, प्रा.स्मिता जयकर, नितीन पाटील यांनी परिश्रम घेतले.