भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखण्याकरीता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली या पार्श्वभूमिवर आज २४ रोजी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट आढळून आला. बाजारपेठेत मात्रक सकाळी लोकांनी एकच गर्दी केल्याने सब्जी मंडीतील भाजीपाला विक्रेत्यांना पोलिसांनी घरी पाठविले. यानंतर शहरात पोलिसांनी गस्त सुरू झाली. यात विनाकारण रस्त्यावर दुचाकीवर फिरणारे व पायी फिरतांना काही तरुण व इसम आढळून आल्यांने त्यांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला. तर अनेकांना ऊठक-बैठक काढून व हात जोडून माफी मागायला लावली.पोलिसांकडून चोप मिळत असल्याच्या चर्चेनंतर मात्र दुपारी ३ वाजेनंतर शहरात शुकशुकाट होता. तुरळक नागरिक कामानिमित्त रस्त्यांवर दिसून आले.
हिंदु धर्मातील पाडवा सणावर कोरोनाचे सावट
दरम्यान कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कलम 144 लागू केला आहे. सर्वदूर संचारबंदी लागू झाल्याने सगळेच खरेदी- विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मुख्यत्वे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा सण २५ मार्च रोजी आहे मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर साधली जाणारी सारीच कामे आता पुढे ढकलली गेली आहेत.कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
भुसावळात सामान्यांसाठी पेट्रोलपंप बंद; फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच डिझेल पेट्रोल पुरवठा होणार ;
महाराष्ट्रातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. मात्र तरीही पेट्रोल घेण्याच्या बहाण्याने सुद्धा गर्दी होतच आहे. त्यामुळे आता शेवटी पेट्रोल पंपावर निर्बंध घालण्यात आले आहे. सर्वसामान्यांसाठी पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि सेवा देणाऱ्यांसाठीच पेट्रोल-डीझेल उपलब्ध असणार आहे.
रेल्वे प्रशासन व परिवहन मंडळाने तीन दिवसांपासून गाड्या रद्द केल्यामुळे दोन्ही ठिकाणे निमर्नुष्य दिसून आली. कमर्चार्यांशिवाय कोणीही दिसून आले नाही. शहरातील काही जिवनावश्यक वस्तूंची दुकाने, मेडिकल्स्, दवाखाने सुरु होती.
संचारबंदीत दिलासा – दरम्यान, शहरात संचारबंदी काळात जिवनावश्यक वस्तूंसाठी काही वेळ शिथिलता देण्यात येणार आहे. या पहाटे ५ ते ८ भाजीपाला लिलाव. भाजीपाला किरकोळ विक्री सकाळी ७ ते १० वाजे दरम्यान तर किरणा, दुध व अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ६ ते १० तसेच मेडीकल्स पूर्ण वेळ सुरु राहतील अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, भाजी पाला खरेदीसाठी एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरातील प्रमुख पाच ठिकाणांवरुन भाजीपाला विक्री करण्यात येणार आहे. यात प्रमुख्याने, आठवडे बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, म्युनिसीपल हायस्कूल, नाहाटा महाविद्यालय परिसरांचा समावेश असणार आहे. तसेच नागरिकांनी रस्त्यावर किंवा घराबाहेर येवू नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
तालुक्यात पुणे, मुंबई, नागपूर येथून आलेल्या नागरिकांना सर्दी, ताप जाणवत असल्याने १२४ जणांची येथील न.पा. रूग्णालयातील कोरोना वार्डात तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना घरी पाठविण्यात आले. घरी राहून काळजी घेण्याबाबत सुचनाही देण्यात आल्या. यात कंडारी येथे आलेल्या दोघांसह ६५ जणंाना रूग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आल्याचे सांगण्यात आले.



