अ‍ॅड.रोहिणी खडसेंसह सतीश पाटील, वैशाली सूर्यवंशी यांचा ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटच्या फेरतपासणीसाठी अर्ज –

जळगाव – राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीकडून मात्र ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला व जिल्ह्यातील तीन पराभूत उमेदवारांनी आता ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटच्या फेरतपासणीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे उमेदवार तथा माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी तीन मतदान केंद्रांवरील तर पाचोरा-भडगाव मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांनी आठ तर मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी 16 मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीॅपॅटच्या फेर तपासणीसाठी अर्ज केले आहे. यासाठी लागणारी रक्कमही त्यांनी भरल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई : जिल्हाधिकारी
निकाल लागल्यानंतर 45 दिवसांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची तज्ञांमार्फत तपासणी होणार आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रामागे 40 हजार रुपये अधिक 18 टक्के जीएसटी शुल्क भरावे लागते. त्यानुसार तिघ उमेदवारांनी एकूण 27 केंद्रांसाठी 12 लाख 74 हजाराची रक्कम भरली आहे. तीनही उमेदवारांनी शुल्क भरून तपासणी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात : अ‍ॅड.रोहिणी खडसे
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये देखील बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या जातात मग भारतातच सरकार बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला का घाबरते? बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवाव्यात, मग सर्व एकदा सर्व स्पष्ट होईल, असे मुक्ताईनगरच्या पराभूत उमेदवार अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या. माझ्या विरोधातील उमेदवाराने दोन दिवस आधीच त्यांना कोणत्या बूथवर किती मतदान मिळेल?, याबाबतची यादी सोशल मीडियात व्हायरल केली आणि त्यानुसारच प्रत्येक बुथवर संबंधित उमेदवाराला मते मिळाली आहेत, हे सगळं संशयस्पद असल्याचेही त्या म्हणाल्या.