रावेर –
देशात जनता कर्फ्यू पाळला जात असताना रावेर शहरात दोन गटात तुफान दगफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. दरम्यान, या दगडफेकीत जखमी झालेल्या व्यक्तीचा आज सोमवार रोजी मृत्यू झाला आहे. यशवंत मराठे (वय-४५,रा. संभाजी नगर) असे मयताचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर रावेर शहरात दोन दिवसांकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे.रावेरातील शिवाजी चौकात- मन्यारवाडा मशिदीजवळ क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. दंगल होताच पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अंधारात पोलिसांना घटनास्थळ गाठण्यात विलंब झाला. पोलिसांनी तीन फैरी झाडल्यानंतर दंगल आटोक्यात आली.
दरम्यान रावेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. प्रार्थना स्थळावरून आलेल्या जमावाने शिवाजी चौकात जोरदार दगडफेक झाल्याने, दोन्ही बाजूने तुफान दगड गोटे एकमेकांवर भिरकवल्याने जोरदार दंगल भडकली. यात संतप्त जमावाने शिवाजी चौकातील व बारी वाड्यातील पाच मोटार सायकली एक टाटा मॅजिक जाळून भक्ष्य केल्या. रात्री १२ वाजता प्रांतअधिकारी यांनी ४८ तासासाठी संचार बंदी घोषित केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
रावेर शहरातील शिवाजी चौक, बारी वाडा, मण्यारवाडा, संभाजी चौक भागात दगड विटा आणि बाटल्यां काचेचा खच पडलेला आहे .दरम्यान रावेर दंगली संदर्भात एकूण ७ गुन्हे दाखल होत असल्याची प्राथमिक माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
रावेर येथे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे, जिल्हापोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले मुक्काम ठोकून आहेत
रावेर येथे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छोरिंग दोरजे यांची भेट दिली तर रात्री आमदार शिरीष चौधरी तसेच सकाळी खा रक्षा खडसे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली
सन 2012 मधील दंगलीची पुनरावृत्ती ;
रावेर मधील संभाजी नगर येथील रहिवासी शोभा बाई महाजन या विधवा महिलेचे घर जाळले असून घरातील काही दागिने आणि सुमारे 20 हजार रुपये अज्ञात समाजकंटकांनी लुटून नेले आहेत, मागील सन 2012 मधील दंगलीत देखील याच महिलेचे घर जाळण्यात आले होते.संचार बंदी मुळे रावेर शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहे .दरम्यान, दंगलीतील मयत यशवंत कांशीराम मराठे याच्या शव विच्छेदननंतर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या संभाजी नगरमधील राहत्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. या वेळी नातेवाईक महिलांनी मोठा आक्रोश केला.


