वरणगाव /भुसावळ –

नेपाळ दुर्घटनेत सात जखमींना काल सायंकाळी मुंबईला आणले आहे. त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर एक-दोन दिवसातच त्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याची माहिती काठमांडूच्या डॉक्टरांनी दिली आहे. चार वाजेच्या इंडिगो विमानाने मुंबईला पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे हे सर्वांच्या संपर्कात आहेत. दुसऱ्या बसमधील भाविकही रविवारी गोरखपूर एक्सप्रेसने स्पेशल एसी कोचने भुसावळ येथे आले व सुखरूप घरी परतले आहे.
काठमांडू येथे प्रशांत पाटील, अतुल झांबरे, गोलू पाटील, अमोल जावळे हे पूर्ण परिस्थिती कळवित आहे. मुंबईला केईएम हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार करून त्यांना एक ते दोन दिवसात घरी पाठविले जाईल. राज्याचे मंत्री गिरीष महाजन मुंबई येथील व्यवस्था करीत आहेत.
दुर्घटनेतील असे आहेत सात जखमी
दुर्घटनेतील सात जखमींमधील भारती पाटील, सुनील धांडे (भुसावळ), वर्षा भंगाळे, कुमुदिनी झांबरे, रूपाली सरोदे, हेमराज सरोदे, नीलिमा भिरूड (वरणगाव) यांना मुंबई येथे आणण्यात आले आहे. त्यांच्यासोबत गोलू पाटील, अमोल जावळे, केदार ओक हे आलेले आहेत.
नेपाळमधून 48 प्रवासी परतले ; रेल्वे स्थानकावर महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला –
नेपाळमध्ये दर्शनासाठी गेलेल्या 43 प्रवासी असलेल्या एका बसचा अपघात होऊन 27 जणांचे बळी गेले तर दुसर्या बसमधील 48 प्रवासी शनिवारी रात्री गोरखपूर येथून निघाले होते. हे प्रवासी 20104 अप गोरखपूर एलटीटी एक्सप्रेसने रविवारी रात्री 9 वाजता भुसावळ स्थानकावर पोचले. सर्व 92 प्रवाशांनी भुसावळ रेल्वे स्थानकावरुनच 16 ऑगस्टला प्रवास सुरू केला होता. यातील 25 जणांचा मृत्यू झाल्याने परत आलेल्या प्रवाशांचा शोक अनावर झाला. अनेकांना रडू कोेसळले. स्थानकावर प्रवाशांच्या नातेवाईकांनी भेटीसाठी गर्दी केली होती. अत्यंत दुर्देवी घटनेत आपले सहप्रवासी गमावल्याने विशेषकरून महिलांनी अश्रृंना वाट मोकळी करुन दिली.
गोरखपूरला सर्वांची आरोग्य तपासणी
आँबुखैरी येथून शुक्रवारी मुक्कामी असलेल्या प्रवाशांनी शनिवारी सकाळी आपला प्रवास सुरु केला. सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान ते गोरखपूरला पोचले. गोरखपूर येथे प्रशासनाने सर्व 48 प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील दोन ते तीन जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच त्यांना तेथे जेवण व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली. दु:खद घटनेमुळे प्रवाशांना जेवणाचीही इच्छा नव्हती, मात्र अधिकारी व प्रशासनाच्या कर्मचार्यांनी विनंती करुन प्रत्येकाने किमान दोन घास अन्न घ्यावे, अशी विनंती करुन जेवण दिल्याचे प्रवासी प्रमोद सरोदे यांनी सांगितले.
भोपाळ स्थानकावर भाजप पदाधिकार्यांनी दिली भेट
गोरखपूर येथून शनिवारी रात्री निघालेले प्रवासी भोपाळ स्थानकावर रविवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या दरम्यान पोहोचले. या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानकावर येत प्रवाशांची भेट घेतली. सर्व प्रवाशांना पाणी बॉटल, चहा-कॉफी व बिस्किटची व्यवस्था केली. सर्व प्रवाशांना धीर देत लोकप्रतिनधी व पदाधिकार्यांनी प्रवाशांचे मनोबल वाढवले. विशेष कोचमध्ये अधूनमधून आरपीएफचे कर्मचारी लक्ष ठेवत असल्याचीही माहिती प्रवाशांनी दिली.
सोबती गमावल्याने मन्न खिन्न
अपघाताचे विदारक चित्र पाहून दुसर्या लक्झरी बसमध्ये असलेले सर्व प्रवासी भेदरले होते. आम्ही सर्वांना धीर देवून परतीच प्रवास सुरू केला होता. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी गोरखपूर येथून विशेष एसी कोच उपलब्ध करुन दिल्याने सोयीचा प्रवास झाला. प्रवासांत सर्व सुविधा मिळाल्या, मात्र आम्ही आमचे सोबत गमावल्याने मन खिन्न झाले आहे. कोणाचीही जेवणाची देखील इच्छा नाही. मात्र गोरखपूर येथे अधिकार्यांनी सर्वांना विनंती करुन जेवण दिल्याचे प्रवासी प्रमोद सरोदे म्हणाले.


