भुसावळ : रेल्वे यार्डात कार्यरत दोन कर्मचार्यांमध्ये ड्युटीच्या वादातून शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर ड्युटी संपून कर्मचारी घराकडे निघाल्यानंतर त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना एलोरा रेल्वे कॉलनीच्या गेटजवळ शनिवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

रेल्वे डाऊन गुड्स 14 नंबर कॅबीनजवळ ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचारी चिन्मय जोशी व संजयकुमार सीताराम यादव यांच्यात पॉईंट लावण्यावरून (सांधे बदलणे) शनिवारी रात्री 11.40 वाजता शाब्दीक वाद वाढला. यावेळी संजयकुमार याने चिन्मय जोशी यास तु फक्त मोबाइलवर गेम खेळत आहे, तू एकही पॉईंट मारलेला नाही, असे म्हटल्यानंतर संशयिताने तु बाहेर ये… अशी धमकी दिली. ही बाब यादव यांनी वरीष्ठ अमित मांगीलाल साळुंखे यांना कळवल्यानंतर त्यांनी चिन्मयला घरी पाठवले व काही वेळेनंतर संजयकुमार यादव घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर वरणगाव रोडवरील एलोरा रेल्वे कॉलनी गेटजवळ शनिवारी रात्री 12.15 वाजता चिन्मय सुनील जोशी (शांती नगर, भुसावळ) व त्याच्या सोबतच्या तिघांनी अडवत शिविगाळ करीत मारहाण केली. यावेळी चिन्मयने रस्त्यावरील दगड उचलून मारल्याने यादव यांच्या कानाजवळ दुखापत झाली. या प्रकरणी संजयकुमार यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिन्मय जोशी (शांतीनगर, भुसावळ) व त्यांच्यासोबत अन्य तीन अनोळखी इसमांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार नेव्हील जॉर्ज बार्टले करीत आहेत.


