भुसावळ : शहरात शनिवारी झालेल्या वादळानंतर ठप्प झालेला वीजपुरवठा तिसर्या दिवशीही सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. शहरातील अनेक भागात अद्यापही वीजपुरवठा ठप्प झाल्याने नागरीक प्रचंड संतप्त झाले असून महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात टिका करीत आहेत. शनिवारी सायंकाळी अवकाळी वादळी पावसात 80 वर ठिकाणी वीज तारा तुटल्या होत्या तर सुमारे 30 हून अधिक ठिकाणचे पोल वाकले होते. शनिवारनंतर यावल रोड भागात सोमवारी दुपारी तीन वाजता सुरळीत वीजपुरवठा करण्यात यश आले मात्र शहरातील अनेक भागात अद्यापही वीज गुल आहे. शहरातील अनेक भागात नागरीकांनीच स्वत: पुढाकार घेत जोडणी करून घेतली आहे.
खडका रोडवरील जाम मोहल्ला, मॉडर्न रोड, सहकार नगर भागातील पत्री शाळा भाग, गजानन महाराज नगर भाग, चिंतामणी विहार तापी नगर, कार्यकारी अभियंता कार्यालय परिसर, बीएसएनएल ऑफिस भाग, सोनिच्छा वाडी परिसर, हनुमान नगर, गणेश पुरी, महेश नगर, विकास कॉलनी महालक्ष्मी हार्डवेअरच्या मागील भाग आदी भागातील वीजपुरवठा मंगळवारीदेखील सुरळीत झाला नसल्याने नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. श्रीनगर भागातील तक्रारीनंतरही तारा जोडण्यात न आल्याने खाजगी वीज सहायकाच्या मदतीने स्वखर्चाने वीज तारा जोडण्यात आल्या. हे कार्य सुरू असताना त्याच ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी.टी.महाजन यांनी भेट दिली. पावसाळ्यात नागरीकांना त्रास होणार नाही, आतापासून नियोजन करावे, अशी मागणी प्रा.धीरज पाटील यांनी केली आहे.



