वरणगावातून जाणाऱ्या महामार्गाचा समांतर निधी नसून तो फक्त मेंटेनन्ससाठीचा निधी :नही’च्या मंजूर पत्रात स्पष्ट उल्लेख; भाजपवाल्यानी वरणगावातील जनतेला खोटी माहिती देवून दिशाभूल करू नये शिवसेनेचा पत्रकार परिषदेत आरोप –

वरणगाव – येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी 3 मे मंगळवारी रोजी फुलगाव ते साई मंदिर वरणगावातून जाणाऱ्या महामार्गला समांतर निधी म्हणून 3 करोड रुपये मंजूर झाल्याने फटाके फोडले. परंतु ‘नही’ने मंजूर केलेल्या तीन करोडच्या पत्रात समांतर महामार्गसाठीचा निधी मंजूर असा कुठेही उल्लेख नाही. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख आहे की, जो जुना महामार्ग आहे त्याची दुरुस्ती करून तो महामार्ग स्थानिक न. पा. कडे हसतांतरित करावा असा उल्लेख असल्याने भाजपवाले जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करीत असल्याचा आरोप दि. 4 मे बुधवारी शिवसेनेने पत्रकार परिषदेत केला.

यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि शहरप्रमुख संतोष माळी यांनी सांगितले की, 2015-16 मध्ये फुलगाव ते साई मंदिर याच समांतर महामार्गसाठी 70 करोड रुपये मंजूर झाले होते. तेव्हा पण भाजपवाल्यानी असेच फटाके फोडून मोठे बॅनर बसस्थानक परिसरात लावले होते. परंतु मंजूर झालेले 70 करोड पैकी 40 करोड ‘नही’ ने परत घेतले. उर्वरित 30 करोड रुपये मग गेले कुठे? त्याचा थांगपत्ता अजूनही नाही आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नागपूर रिजनल ऑफिस यांच्या वतीने 2 मे रोजी फुलगाव ते साई मंदिर वरणगावातुन जाणाऱ्या महामार्गासाठी 3 करोड 29 लाख 98 हजार 706 रुपये इतका निधी मंजूर झाल्याचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. या पत्रात फुलगाव ते साई मंदिर महामार्ग जसा आहे तसाच ठेवून त्याला दुरुस्त करून स्थानिक न.पा. कडे हस्तांतरित करण्याचा स्पष्ट उल्लेख आहे.

भाजपने वरणगावातील जनतेची दिशाभूल करणे थांबवावे –

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी फटाके फोडून मोठ्या आवेशात सांगितले की, फुलगाव ते साई मंदिर नवीन समांतर महामार्ग होणार असून त्यातील चार पुल नंतर होणार आहे. परंतु असा कुठलाही नवीन समांतर महामार्ग होणार नसून जुना महामार्ग आहे, तो तसाच ठेऊन त्याची फक्त दुरुस्ती करावी असा उल्लेख ‘नही’च्या पत्रात आहे. भाजपवाले नवीन समांतर महामार्गासाठीचा निधी मंजूर झाल्याचे सांगत असून ते वरणगावकरांची फसवणूक आणि दिशाभूल करीत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेने केला आहे.

शिवसेना संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना वरणगाव शहरप्रमुख संतोष माळी, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफरली उर्फ हिपीशेठ, युवा जिल्हाधिकारी चंद्रकांत शर्मा, भुसावळ तालुका अल्पसंख्याक संघटक मोहसीन खान, माजी ग्रा.पं. सदस्य विलास वंजारी यांची उपस्थिती होती.