तुकोबारायांच्या अभंगगाथ्यात गनिमी काव्याच्या तंत्राचे मूळ : प्रा.डॉ. गजानन महाराज वाव्हळ : शिवदर्शन सप्ताहात गुंफले प्रथम पुष्प :

भुसावळ – छत्रपती या शब्दाची उत्पत्ती तुकोबारायांच्या अभंगात दिसून येते. स्वराज्य निर्मितीसाठी शिवाजी महाराजांच्या पाठीशी मावळे उभे करणे गरजेचे होते. जगद्गुरू तुकोबाराय यांनी आपल्या पाईकीच्या अभंगातून सह्याद्रीचे चपळ निष्ठावंत मावळे उभे केले. मावळ्यांसारखी पोलादी माणसे शिवरायांना गाथ्यामुळे मिळाली. तुकोबारायांनी ‘आपणा राखूनी ठकावे आणिक । घ्यावे सकळीक हिरोनिया ।।’ असे युद्धतंत्र शिवरायांना दिले. त्यामुळे गनिमी काव्याच्या तंत्राचे मूळ हे तुकोबारायांच्या गाथ्यात सापडत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय शिवकीर्तनकार प्रा.डॉ. गजानन महाराज वाव्हळ (पुणे) यांनी केले.
भुसावळ येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित शिवदर्शन सप्ताह ऑनलाईन व्याख्यानमालेत ‘तुकोबाराय आणि शिवराय’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हभप चंद्रकांत महाराज साकरीकर यांनी पुष्पहार अर्पण केला तर जि. प. सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी हभप लक्ष्मण महाराज, ज्ञानेश्वर पाटील व अध्यक्ष संजीव पाटील उपस्थित होते. डॉ.जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही व्याख्यानमाला शिवचरित्राचे अनेक पैलू आठ दिवसात उलगडणार असल्याचे जि.प. सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी सांगितले. शिवदर्शन सप्ताहातील आगळीवेगळी व्याख्यानमाला श्रोत्यांसाठी वैचारिक मेजवानी असल्याचे डायट अधिव्याख्याता शैलेश पाटील यांनी सांगितले. प्रास्ताविकात व्याख्यानमालेचे समन्वयक डी.के. पाटील यांनी शिवदर्शन सप्ताह आयोजनाचा हेतू सांगून आठ दिवसात होणाऱ्या व्याख्यानांची माहिती दिली. डॉ.जगदीश पाटील यांनी प्रा.डॉ. गजानन महाराज वाव्हळ (पुणे) यांचा परिचय करून दिला. ‘तुकोबाराय आणि शिवराय’ या विषयावर बोलताना प्रा.डॉ. गजानन महाराजांनी ‘चला गड्यांनो, शिवरायांचा विचार ध्यानी ठेवा राष्ट्र बनवू महान’ हे गीत सादर केले. ते पुढे म्हणाले की, लाल महालातील जाणता राजा आणि देहू येथील जगद्गुरु यांचा घनिष्ठ संबंध होता. तुकोबाराय यांच्या अभंगगाथेत पाईकीचे प्रकरण आहे. यातून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. देहूचे जानोजी भोसले यांच्याकडे ते वेळोवेळी तुकोबारायांची विचारपूस करत. याबाबत शिवाजी महाराजांची अनेक पत्रे उपलब्ध आहेत. ‘पाईक तो जाण पाईकाचा भाव । लगबग ठाव चोरवाटा ।। येऊ नेदी लाग । लागो नेदी माग ।।’ यासह इतर अभंगांच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी मार्गदर्शन केले आहे. तुकोबांचे अभंग उदात्त भावना निर्माण करणारे आहेत. प्रत्येकाचा धर्म जगावा यासाठी शिवरायांनी आपल्या राज्याचे नाव स्वराज्य ठेवले. शिवराय व तुकोबा यांचा इतिहास आज आपण अभ्यास करत आहोत याचा अर्थ आपला डीएनए त्यांच्याशी मॅच करत आहे. संतांचे वाङ्मय ढग व समुद्राप्रमाणे आहे. त्याचाच लाभ शिवाजी महाराजांना देखील झाला. त्यामुळे परमेश्वर व शिवराय असे म्हणताना आपल्याला सारखाच अनुभव येत असल्याचे असल्याचेही प्रा.डॉ. गजानन महाराज यांनी सांगितले. सूत्रसंचालन डी.के. पाटील यांनी तर आभार संस्थेचे अध्यक्ष संजीव पाटील यांनी मानले.