रेल्वेतून ऐवज चोरी झालेल्या दाम्पत्याला भरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक न्यायालयाचे आदेश –

भुसावळ : रेल्वे प्रवासात ऐवज चोरीला गेल्यानंतर दाम्पत्याने तक्रार दाखल करीत जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर दाम्पत्याला 73 हजार 779 रुपये नुकसान भरपाई, मानसिक त्रासापोटी 25 हजार रुपये व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून पाच हजार रुपये असे एक लाख तीन हजार 779 रुपये रेल्वे विभागाने देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिले आहेत.

भुसावळातील वकील दाम्पत्याच्या ऐवज रेल्वेतून चोरीला
भुसावळ शहरात राहणार्‍या परवीन नवाब अहमद व त्यांचे पती अ‍ॅड. नबाव अहमद हे दोघे हबीबगंज-धारवाड एक्स्प्रेसने 14 एप्रिल 2019 रोजी भुसावळवरून पुण्याला गेले. एस- 5 कोचमध्ये दोन सीटवर त्यांनी आरक्षण केले होते. पहाटे 3.30 वाजता मनमाड स्थानकाजवळ परवीन यांनी डोक्याखाली ठेवलेली पर्स चोरट्याने लांबवली. या पर्समध्ये 25 हजार रुपये रोख, सोनसाखळी, सोन्याचे पँडल, दोन घड्याळ, एक मोबाइल, वायफाय राऊटर व किरकोळ वस्तू होत्या. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी संबंधित स्थानकावर तक्रार नोंदवली होती. आरक्षित डब्यात अनधिकृत व्यक्ती, चोरट्यांनी प्रवेश करून प्रवाशांच्या वस्तू चोरल्यास त्याची जबाबदारी रेल्वे विभागाची असते. या मुद्यावरून अहमद दांपत्याने ग्राहक न्यायालयात धाव घेऊन नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक, पुणे, सोलापूर व भुसावळचे मंडल रेल्वे प्रबंधक तसेच भारती अ‍ॅक्सा विमा कंपनीला प्रतिवादी करण्यात आले होते. विमा कंपनीत प्रवाशांचा अपघात व मृत्यूबाबत जबाबदारी असते चोरीबाबत नाही म्हणून त्यांना वगळण्यात आले तर रेल्वे विभागाने प्रवासी व त्यांच्या सामानाची सुरक्षा न घेता त्रुटीयुक्त सेवा दिल्यामुळे त्यांना दोषी धरण्यात आले. तक्रारदार अहमद दाम्पत्याला नुकसान भरपाईसह इतर खर्च देण्याचे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले. अहमद यांच्यातर्फे अ‍ॅड.राजेश उपाध्याय व हेमंत भंगाळे यांनी काम पाहिले.