भुसावळ : आयुध निर्माणीचे अखेर शुक्रवार, 1 ऑक्टोबरपासून निगमीकरणात रुपांतर झाले. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड कोलकाताच्या अखत्यारीत येणार्या या कारखान्याचा आता ‘डिफेन्स पब्लिक सेक्टर युनिट’मध्ये समावेश झाला. यामुळे त्याचे ‘भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी यंत्र इंडिया लिमिटेड, भारत सरकारचा उद्योग’ असे नामकरण झाले. हा बदल होताच आयुध निर्माणी भुसावळच्या तब्बल 832 कर्मचार्यांची ‘यंत्र इंडिया लिमिटेड’ तात्पुरत्या स्वरुपात प्रतीनियुक्ती झाली. मात्र, या दोन वर्षांत त्यांना ‘केंद्र शासनाचे कर्मचारी’ हाच दर्जा कायम राहील.
केंद्र सरकारने देशभरातील 41 आयुध निर्माणींची निगमीकरणात रुपांतराची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
यात भुसावळ आयुध निर्माणीचा समावेश आहे. 41 कारखान्यांचे 7 विविध निगम केले आहेत. यात भुसावळची आयुध निर्माणी डिफेन्स पब्लिक सेक्टर युनिटमध्ये येणार्या यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये रुपांतरीत झाली. या निगमीकरणात भुसावळ फॅक्टरीतील तब्बल 832 कर्मचार्यांना दोन वर्षांसाठी या कंपनीत तात्पुरती प्रतिनियुक्ती दिली आहे. या कालवधीत त्यांना दोन वर्षे केंद्रीय सरकारी कर्मचारी हा दर्जा कायम राहील. मात्र, यंत्र इंडिया लिमिटेडअंतर्गत काम करावे लागेल आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या निर्णयावर कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान कर्मचार्यांचे काळ्या फिती लावून काम
निगमीकरणाच्या निर्णयास कामगारांनी विरोध कायम ठेवला आहे. भुसावळ निर्माणीत देखील शुक्रवारी कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून काम केले. शेवटपर्यंत निगमीकरणाला विरोध राहिल, अशी भूमिका घेतली. देशातील 41 पैकी 10 आयुध निर्माणी महाराष्ट्रात असल्याने राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी ऑल इंडिया डिफेन्स एम्पॉईज फेडरेशनचे राजेंद्र झा यांनी केली आहे.
राज्यात 10 कारखाने, दोन गटात विभागणी
राज्यात 10 आयुध निर्माणी आहेत. या दहा आयुध निर्माणींची दोन गटात विभागणी झाली आहे. यापैकी भुसावळ, अंबाझरी आणि अंबरनाथ या फॅक्टरीचा यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये रुपांतर झाले. या कंपनीचे मुख्यालय अंबाझरीमध्ये आहे. तर उर्वरित वरणगाव, चांदा, देहू रोड, भंडारा, चंद्रपूर, खडकी पुणे येथील दोन अशा 7 फॅक्टरींचे मुनिसन्स इंडिया लिमिटेड या डिफेन्स पब्लिक सेक्टरमध्ये रुपांतर झाले. या फॅक्टरीचे नवीन मुख्यालय आता खडकी (पुणे) येथे असेल.



