भुसावळ (प्रतिनिधी )- नाहाटा महाविद्यालयातील रिसर्च अँड डेव्हलपमेंट समितीतर्फे ‘लिटरेचर रिव्ह्यू अँड प्रोजेक्ट रायटिंग’ या विषयावर १ सप्टेंबर २०२६ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एन. पाटील होते. प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. जी. आर. वाणी उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. व्ही. एन. महिरे, तर समिती प्रमुख डॉ. एस. डी. येवले व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. व्ही. एन. महिरे यांनी आपल्या व्याख्यानातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रकल्पावर काम करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रकल्पासाठी योग्य विषयाची निवड कशी करावी, सविस्तर व सखोल लिटरेचर रिव्ह्यू कसा करावा, तसेच इंटरनेटच्या युगात साहित्य आढावा घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध साधनांचा व टूल्सचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. डी. एन. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार लागू झालेल्या प्रकल्पांचे महत्त्व विषद केले. विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती विकसित करून प्रकल्पाच्या माध्यमातून विषयाचा सखोल अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात एकूण ७० विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख डॉ. एस. डी. येवले यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. एम. जे. जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. ए. जे. हिवाळे, डॉ. के. ए. वारके, डॉ. रश्मी शर्मा, डॉ. ए. डी. क्षिरसागर तसेच रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.



