ऑपरेशन नार्कोस : 25 किलो गांजासह दोन महिला अटकेत; आरपीएफची भुसावळमध्ये मोठी कारवाई


भुसावळ (प्रतिनिधी ) - मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) मोठी कारवाई करत 25.167 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 12 लाख 58 हजार 350 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना जीआरपी, भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिलांची ओळख सीमा (वय 24, रा. सोहागपूर, जि. होशंगाबाद, मध्य प्रदेश) आणि ज्योतिदेवी सिंह मालवीय (वय 26, रा. होशंगाबाद, मध्य प्रदेश) अशी झाली आहे.

एसी कोचमध्ये संशयास्पद हालचालींवर आरपीएफची नजर

दिनांक 23 ऑगस्ट रोजी पुरी-गांधीधाम एक्सप्रेसच्या एसी कोच बी-3 मध्ये आरपीएफचे पथक संशयास्पद प्रवाशांवर लक्ष ठेवून होते. यावेळी निरीक्षक सुनील कोळी, सुशील धर्मे आणि सोनल इंगळे यांच्या पथकाला दोन्ही महिलांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

त्यांच्या ट्रॉली बॅगची तपासणी करत असताना त्यामध्ये मादक पदार्थ लपवून नेले जात असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर आरपीएफच्या ‘वीरू’ या शोधी श्वानाने दोन्ही बॅगमध्ये मादक पदार्थ असल्याचे संकेत देत संशयाची पुष्टी केली.

दोन बॅगमधून सहा बंडलमध्ये गांजा जप्त

यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पंच साक्षीदार तसेच राजपत्रित अधिकारी जितेंद्र कुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत दोन्ही बॅगची सखोल झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान दोन्ही बॅगमधून सहा बंडलमध्ये एकूण 25.167 किलो गांजा आढळून आला.

आरपीएफने दोन्ही महिलांना ताब्यात घेऊन जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी जीआरपी, भुसावळ यांच्या स्वाधीन केले आहे. रेल्वे परिसरातून होणाऱ्या मादक पदार्थांच्या तस्करीविरोधात आरपीएफची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून ‘ऑपरेशन नार्कोस’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.