भुसावळ ( प्रतिनिधी )- जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या 'मिशन राईज' अभियानांतर्गत इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "नशामुक्त जळगावासाठी एकजूट होऊया" हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे तसेच युवक-युवतींमध्ये अमली पदार्थ व इतर व्यसनांविषयी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. भुसावळ शहरात स्पर्धेसाठी बियाणी मिलिटरी स्कूल, कमल गणपती हॉल आणि तापी पब्लिक स्कूल ही तीन केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी 'मिशन राईज' अभियानाच्या चार प्रमुख विषयांवर आधारित पोस्टर तयार करावयाचे आहेत. त्यामध्ये 'व्यसनाला विरोध करा', 'इतरांना प्रेरणा द्या', 'मित्रांना योग्य साथ द्या' आणि 'व्यसनमुक्त समाज अधिक सक्षम बनवा' या विषयांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभाग पूर्णतः निःशुल्क असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले नाव व शाळेचे नाव ९८२२८२७७६६ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवून नोंदणी करावी. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींची निवड करून विजेत्यांना प्रमाणपत्रे व आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी, परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या जनजागृती अभियानात सहभागी होऊन 'नशामुक्त जळगाव' घडविण्यासाठी आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. '


