भुसावळ (प्रतिनिधी )-: तालुका विधी सेवा प्राधिकरण, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ नगर, सत्यसाई नगरजवळ, खडका रोड परिसरात महिलां व बालकांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. न्यायालयामार्फत पी.एल.व्ही. सौ. संगीता राजेंद्र भामरे यांना देण्यात आलेल्या या उपक्रमात पॉक्सो कायदा, महिलांची सुरक्षितता व गोपनीयता, कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध आणि बालविवाहमुक्त भारत अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमासाठी रिटेनर लॉयर अॅड. प्रियांका (प्रिया) आडकमोल प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी महिलांना व बालकांना लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ (POCSO Act) याविषयी सविस्तर माहिती दिली. लहान मुलांना ‘गुड टच–बॅड टच’ याबाबत सोप्या व समजण्यासारख्या भाषेत मार्गदर्शन करून स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. महिलांना समाजातील सुरक्षितता, महिलांचे कायदेशीर हक्क, कार्यस्थळी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे महत्त्व तसेच आवश्यकतेनुसार कायद्याची मदत कशी घ्यावी, याविषयी माहिती देण्यात आली. कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३ तसेच पॉक्सो कायद्यातील विविध तरतुदींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या Aureliano Fernandes विरुद्ध State of Goa या निर्णयाच्या अनुषंगाने अधिकारी, व्यवस्थापन, कर्मचारी तसेच किशोरवयीन मुला-मुलींमध्ये कायद्याबाबत जनजागृती व संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बालविवाहाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती बालविवाहमुक्त भारत अभियानांतर्गत बालविवाहाचे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम, बालविवाहास प्रतिबंध करणारे कायदे, मुलगा व मुलगी योग्य वयातच विवाहबद्ध होण्याचे महत्त्व तसेच मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्याची गरज याबाबत उपस्थित महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. सीमा ताई वानखेडे यांनी रिटेनर लॉयर अॅड. प्रियांका आडकमोल व पी.एल.व्ही. सौ. संगीता राजेंद्र भामरे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सौ. सीमा ताई वानखेडे यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. वर्षावास व गुरु पौर्णिमेनिमित्त परिसरात सुरू असलेल्या ग्रंथवाचन कार्यक्रमात सहभागी होत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुसळधार पाऊस सुरू असतानाही मोठ्या संख्येने महिला व लहान बालके कार्यक्रमास उपस्थित राहिली. न्यायालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या जनजागृती पत्रकांचे वाटप करून उपस्थितांना विविध कायदे व त्यांच्या हक्कांबाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सीमा ताई वानखेडे यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले. प्रतिकूल हवामानातही उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्या रिटेनर लॉयर अॅड. प्रियांका आडकमोल यांचेही मनःपूर्वक आभार मानण्यात आले. कार्यक्रमास सौ. सीमा ताई वानखेडे, सौ. अश्विनी रत्नदीप चंदनशिवे, सौ. शोभा भीमराव सोनवने, अश्विनी पगारे, सौ. रेखा निलेश साळुंके, सौ. मंगला गायकवाड, सौ. सीमा राहुल सोनवने, ऋषी मनिषा सोनवने, नंदा बालकृष्ण सोनवने, सौ. रूपा सुरळकर, अश्विनी सचिन पवार, सौ. दीपा वाघमारे, राणी कांबडे, संगीता धोंडेराव, प्राजक्ता चंदनशिवे, मिथिलेश आडांगे, विक्रांत चंदनशिवे, आरोही साळुंके आदी उपस्थित होते. तसेच तनिष्क वानखेडे, समीक्षा वानखेडे, आद्विक कोळंगे, ऋषी सोनवने, भूमिका गायकवाड, प्राची चंदनशिवे, वंशिका सोनवने, अनुश्रीका सुरळकर, अनिता वाघमारे, हितेश सोनवने, आरोही सोनवने, यशवंत सोनवने, श्लोक वानखेडे यांच्यासह अनेक बालकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला. कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व महिला, बालके व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


