भुसावळ (प्रतिनिधी) - ब्राह्मण संघ, भुसावळ यांच्या वतीने शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी महर्षी कण्वऋषींच्या जीवनचरित्र व कार्यावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी रत्नाकर क्षीरसागर यांनी महर्षी कण्वऋषींच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण व मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष गणेश वढवेकर होते. यावेळी सचिव महेंद्र गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या व्याख्यानात रत्नाकर क्षीरसागर यांनी महर्षी कण्वऋषींची तपश्चर्या, साधना तसेच आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन समाजाला दिलेली शिकवण याबाबत सविस्तर माहिती दिली. महर्षी कण्वऋषींनी अहिंसा, परोपकार, सेवाभाव, स्त्री शिक्षण, राजशिष्टाचार व राजधर्म यांसंदर्भात घालून दिलेली नियमावली आजच्या काळातही तितकीच महत्त्वपूर्ण आहे. समाज व राष्ट्रहितासाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. अभ्यासपूर्ण व मुद्देसूद विवेचनातून त्यांनी महर्षी कण्वऋषींच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना करून दिली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गणेश वढवेकर म्हणाले, “ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ विचारू नये; मात्र त्यांचे तत्त्वज्ञान अनुकरणीय असते. समाजाने हे लक्षात घेऊन ऋषी-मुनींच्या विचारांचा आदर्श घ्यावा.” तसेच ब्राह्मण संघाच्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना समाजबांधवांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज जोशी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शशिकांत भालेराव यांनी करून दिला, तर आभार सचिव महेंद्र गोडबोले यांनी मानले. यावेळी ब्राह्मण संघाचे कोषाध्यक्ष अमोद टेम्भूर्णीकर, संजय बोचरे, जयंत जोशी, कल्पना दामले, माजी अध्यक्ष ॲड. संजय जोशी, दिलीप ओक, रामभाऊ गचके, साधनाताई रिसबूड यांच्यासह ब्राह्मण समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ब्राह्मण संघाची कुलदेवता श्री महालक्ष्मी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद व अल्पोपहाराचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.


