भुसावळ (प्रतिनिधी) , दि. ८ जुलै : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांसमवेत भुसावळ–अकोला रेल्वे मार्गाची सविस्तर पाहणी करून रेल्वे संचालनातील सुरक्षितता, कार्यक्षमता, पायाभूत सुविधांची स्थिती तसेच सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेवर रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची तपासणी करण्यात आली. मलकापूर येथील ट्रॅक्शन सब-स्टेशन (TSS) आणि टीआरडी डेपोची पाहणी करून विद्युत ट्रॅक्शन यंत्रणांची कार्यस्थिती व देखभाल तपासण्यात आली. तसेच अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मलकापूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा व गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला. याशिवाय कि.मी. 494/25 येथील कंटिन्युइटी बाँड (C-Bond) ची तपासणी करून रेल्वे ट्रॅकची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि प्रतिबंधात्मक देखभालीवर विशेष भर देण्यात आला. नांदुरा स्थानकावरील अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकास कामांचीही पाहणी करण्यात आली. यामध्ये सर्क्युलेटिंग एरिया, बुकिंग कार्यालय तसेच विविध प्रवासी सुविधांची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच कि.मी. 522/20–22 येथील समपार फाटक क्रमांक 20 ची तपासणी करून ट्रॅक व समपार फाटकावरील सुरक्षा व्यवस्था, देखभाल आणि कार्यपद्धतीची पाहणी करण्यात आली. यावेळी गेटमनशी संवाद साधून त्याच्या सुरक्षा विषयक ज्ञानाचीही पडताळणी करण्यात आली. यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अकोला व पारस रेल्वे स्थानकांची पाहणी करून प्रवासी सुविधा, स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. सुरक्षित, विश्वासार्ह आणि प्रवासी-केंद्रित रेल्वे सेवा अधिक सक्षम करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले. या पाहणीदरम्यान भुसावळ विभागातील विविध शाखांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


