भुसावळ(प्रतिनिधी ) -दि. ४ जुलै : भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवाडे नगर परिसरात शनिवारी (दि. ४ जुलै) रात्री एका ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वांजोळा रोडवरील भारंबे कॉलनी, स्टार लॉनजवळील परिसरात राहणारे रेल्वे कर्मचारी प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय ५८) हे शनिवारी रात्री कर्तव्यावर असताना त्यांचा संशयित आरोपी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर) याच्याशी अज्ञात कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले असून, आकाश गोरखा याने कुलकर्णी यांच्या डोक्यावर लोखंडी पट्टीने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर दुखापत होऊन व अतिरक्तस्रावामुळे कुलकर्णी यांचा मृत्यू झाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा व प्राथमिक तपास सुरू केला. दरम्यान, संशयित आरोपी आकाश भानुदास गोरखा याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित संशयित हा मनोरुग्ण असून त्याच्यावर ठाणे येथे उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. तसेच, त्याच्यावर पूर्वी दोन गुन्हे दाखल असून २०२१ नंतर त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा नोंद झालेला नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भंगार चोरीच्या वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू आहे. दरम्यान, अवघ्या चार दिवसांपूर्वी शहरातील आरपीडी रोड परिसरात एका धार्मिक स्थळाची स्वच्छता करणाऱ्या सेवेकऱ्याची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच घडलेल्या या दुसऱ्या खुनामुळे भुसावळ शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सलग घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे शहरवासीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


