संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; देवघरासह देवमूर्ती सुरक्षित, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना; शेकडो वर्षे जुने मंदिर बाधित, स्ट्रक्चरल ऑडिटपर्यंत मंदिर राहणार बंद

अमळनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात "प्रति पंढरपूर" म्हणून ओळख असलेल्या अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला बुधवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत वाडी संस्थानाचे मोठे नुकसान झाले असले, तरी देवघर व देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांमध्ये आश्चर्य व समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर काही दिवस भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हभप प्रसाद महाराज यांच्या नेतृत्वाखाली संत सखाराम महाराजांची दिंडी बुधवारी सकाळीच पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. रात्री सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास वाडी संस्थानातील सीसीटीव्ही यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्याने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वरील बाजूस असलेल्या प्रसाद महाराजांच्या बैठक खोलीत आग लागली.

संपूर्ण मंदिर लाकडी बांधकामाचे असून त्यावर दरवर्षी ऑइल पेंट करण्यात येत असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अमळनेर व पारोळा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच परिसरातील नागरिकांनी खाजगी वाहने व पाण्याच्या टँकरच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

आमदार अनिल पाटील यांनी तातडीने चोपडा, शिरपूर व पारोळा येथील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच आर.बी. कन्स्ट्रक्शनचे पाण्याचे टँकरही घटनास्थळी पाठविण्यात आले. अमळनेर शहर पत्रकार संघानेही सोशल मीडियाद्वारे खाजगी टँकरधारकांना मदतीचे आवाहन केले.

घटनेची माहिती मिळताच अमळनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे, पारोळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणल्याने अग्निशमन दलाला मदतकार्य करणे सोयीचे झाले.

या दुर्घटनेदरम्यान हिंदू-मुस्लिम ऐक्याचेही दर्शन घडले. विविध सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह अनेक मुस्लिम बांधवांनीही आग विझविण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे परिसरात सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण झाला.

दरम्यान, शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचे मोठे नुकसान झाले असले, तरी हभप प्रसाद महाराज यांनी "आधी पांडुरंग महत्त्वाचा" अशी भूमिका घेत पंढरपूरच्या दिंडीचा प्रवास सुरूच ठेवला. यामुळे भाविकांमध्ये त्यांच्या श्रद्धा व समर्पणाबाबत विशेष चर्चा होत आहे.

प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या संरचनेचे मोठे नुकसान झाल्याने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.