चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कारविधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी घडामोड

चाळीसगाव - जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख यांच्या शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक तसेच दोन अपक्ष नगरसेवक अशा एकूण १३ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.


चाळीसगाव येथे दुपारी २ वाजता स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या राजगड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी व दोन अपक्ष नगरसेवकांनी जळगाव येथे होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला.

यावेळी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना अपक्ष नगरसेविका सौ. सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मतदारांकडे साधे मत मागण्यासाठीही आलेला नाही. अशा उमेदवाराला आम्ही मत कसे द्यावे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे.” ते पुढे म्हणाले की, “निवडणुकीत उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे लोकशाहीची थट्टा होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. याच कारणामुळे आम्ही या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.”

 
चाळीसगाव शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच रोशन जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख, शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक तसेच दोन अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.