नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये वृक्षसंवर्धनाचे संस्कार रुजवा : डॉ. सुरेंद्रसिंग पाटील


भुसावळ (प्रतिनिधी)- १६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ला सुरुवात होत असून, शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर होणारे संस्कार त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये झाडे, पर्यावरण आणि इतर सजीवांविषयी प्रेम व जाणीव निर्माण करण्यासाठी वृक्षसंवर्धनाचे संस्कार रुजविण्याची गरज असल्याचे आवाहन पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि जंगलक्षेत्रात होत असलेल्या घटीमुळे तापमानवाढ, प्रदूषण आणि विविध पर्यावरणीय संकटे निर्माण होत आहेत. कोरोनासारख्या महामारींसह अनेक नैसर्गिक व आरोग्यविषयक समस्यांना मानवजातीला सामोरे जावे लागत आहे. तसेच पर्यावरणाचा समतोल राखणारे पशू, पक्षी आणि इतर सजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, झाडांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. शाळांमध्ये पर्यावरणविषयक प्रतिज्ञा घेऊन विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनाची प्रेरणा देण्याचा उपक्रम राबविण्याचे त्यांनी सुचविले.

विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण प्रतिज्ञा

"सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो, पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड फळ देते, फुले देते, पाने देते, पक्ष्यांना निवारा देते आणि श्वासासाठी ऑक्सिजन देते. आईच्या प्रेमाप्रमाणे झाड आपले लाड करते. झाड हे आपले औषध आहे, झाड हे आपले देव आहे. झाडे असतील तरच आपली निरोगी वाढ होईल. म्हणून आम्ही झाडे लावू, झाडे जगवू आणि पर्यावरणाचे रक्षण करू."

डॉ. पाटील यांनी सांगितले की, ही प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष वृक्षारोपण करून घेतल्यास त्याचा अधिक प्रभाव पडेल. शासकीय व निमशासकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतल्यास शाळा परिसर, गाव आणि परिसर हिरवागार होण्यास मोठी मदत होईल.

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून योगदान दिल्यास भावी पिढीसाठी निरोगी आणि संतुलित पर्यावरण निर्माण करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.