सराफा व्यावसायिकाची १८ लाखांची फसवणूक; कृउबा समिती अध्यक्षांच्या मुलाविरुद्ध तक्रार

जळगाव : सोने कर्जासाठी तारण ठेवलेले सोने सोडवून दागिने मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबा) फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय अमृत महाजन यांचा मुलगा ओम संजय महाजन याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

फिर्यादी कृष्णा भगवान शिंदे (रा. रामचंद्र नगर, जळगाव) हे जोशीपेठेतील कालभैरव मंदिराजवळ “ओम ज्वेलर्स” नावाने सराफा व्यवसाय करतात. तक्रारीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी ओम महाजन याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ४ जून रोजी ओम महाजन याने फोन करून बजाज फायनान्समध्ये तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर १९ लाख रुपयांचे गोल्ड लोन असल्याचे सांगितले. हे दागिने सोडवून मोडायचे असल्याने आर्थिक मदतीची विनंती त्याने केली.

विश्वास संपादन करण्यासाठी ओम महाजन याने तत्कालीन बँक व्यवस्थापक सुरेंद्र खंडेलवाल यांचे नाव सांगितले तसेच दागिन्यांचे फोटो पाठवून व्यवहाराबाबत संपर्क वाढवला. ५ जून रोजी तो शिंदे यांच्या दुकानात आला आणि तातडीने १९ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी सोने कारागीर चेतन दुसाने यांच्या माध्यमातून शेजारील एका सराफा व्यावसायिकाकडून तात्पुरती १९ लाख रुपयांची रक्कम उभी करण्यात आली.

दुसऱ्या दिवशी, ६ जून रोजी शिंदे, चेतन दुसाने आणि ओम महाजन यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन १९ लाख रुपये ओम महाजनच्या खात्यात जमा केले. त्यानंतर त्याने ही रक्कम गोल्ड लोन खात्यात वर्ग केल्याचे सांगितले. मात्र तांत्रिक अडचणी, केवायसी प्रक्रिया अपूर्ण असणे, खाते सीझ होणे आदी कारणे देत व्यवहार लांबवत राहिला. यानंतर कोटक महिंद्रा बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, तरीही रक्कम परत मिळाली नाही.

दरम्यान, ओम महाजन याने वेळकाढूपणा करत सोमवारी किंवा मंगळवारी पैसे परत देण्याचे आश्वासन दिले. ८ जून रोजी त्याने शिंदे यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ९९ हजार रुपये जमा केले. मात्र उर्वरित रक्कम देण्याबाबत केवळ आश्वासने देत राहिला. पुढे त्याने फोन उचलणेही बंद केले.

फसवणुकीची शंका आल्याने कृष्णा शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओम महाजन यांचे वडील तथा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय महाजन यांची भेट घेतली. त्यांनी मुलगा घरी नसल्याचे सांगत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही ना दागिने मिळाले, ना संपूर्ण रक्कम परत मिळाली.

अखेर आपली १८ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर कृष्णा शिंदे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इतर फसवणुकीची प्रकरणेही येण्याची शक्यता

ओम महाजन याने यापूर्वीही काही व्यक्तींना अशाच प्रकारे फसवल्याची चर्चा परिसरात होती. मात्र तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आले नव्हते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत आणखी काही फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.