मध्य रेल महिला कल्याण संघटनेच्या आर्ट वर्कशॉपचा यशस्वी समारोप :

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल महिला कल्याण संघटना (CRWWO), भुसावळ यांच्या वतीने ताप्ती क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या आर्ट वर्कशॉपचा यशस्वी समारोप ११ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. महिला व मुलांमध्ये कलेची आवड निर्माण करणे तसेच त्यांच्या सर्जनशील प्रतिभेला प्रोत्साहन देणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

समारोप समारंभात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल तथा मध्य रेल महिला कल्याण संघटना, भुसावळच्या अध्यक्षा श्रीमती रेखा अग्रवाल यांच्या हस्ते कार्यशाळेचे प्रशिक्षक व कला शिक्षक श्री दीपक कुमार पंडित (दिल्ली) यांचा त्यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शन आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला



या कार्यक्रमास विभागातील वरिष्ठ शाखा अधिकारी, मध्य रेल महिला कल्याण संघटनेच्या उपाध्यक्षा, संघटनेच्या सदस्यांसह कार्यशाळेतील सहभागी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कार्यशाळेच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा सर्जनशील व कौशल्यवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यशाळेदरम्यान सहभागींच्या कलागुणांना वाव मिळाला असून समारोपप्रसंगी त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागींच्या कलाकृतींचे अवलोकन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.