भुसावळात जय गणेश फाउंडेशनतर्फे ३१ जुलैपासून फिरती द्वारकाई नेमाडे व्याख्यानमाला : राज्यभरातील दिग्गज वक्ते मांडणार विचार ;

भुसावळ (प्रतिनिधी) - 
विद्यार्थ्यांमध्ये वाचन, चिंतन आणि श्रवणाची आवड निर्माण व्हावी यासाठी जय गणेश फाउंडेशनतर्फे कै. द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ आयोजित तीन दिवसीय फिरती व्याख्यानमाला ३१ जुलै, १ ऑगस्ट आणि ३ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. यंदा या व्याख्यानमालेचे १३ वे वर्ष असून, यात 'कविता, संस्कार आणि मायबाप' या मध्यवर्ती संकल्पनेवर तीन विविध विचारपुष्पे गुंफली जाणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या १२ वर्षांत राज्यभरातील तब्बल ३६ नामवंत वक्त्यांनी या व्यासपीठावरून मार्गदर्शन केले आहे. यावेळी अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

असा असेल व्याख्यानमालेचा कार्यक्रम:
प्रथम पुष्प (३१ जुलै, सकाळी ९:०० वा.):

स्थळ: दादासाहेब आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालय, भुसावळ

वक्ते: प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी (धुळे).  


विषय: ‘लोकसाहित्यातून संस्कार आणि लोकजागर’

द्वितीय पुष्प (१ ऑगस्ट, सकाळी ९:०० वा.):

स्थळ: रा. धो. माध्यमिक विद्यालय, कुऱ्हे पानाचे

वक्ते: कवी विशाल उशिरे (खालापूर) व कवी भगवान खोंदले (बुलढाणा)

विषय: ‘माणसं जोडणाऱ्या कविता’

तृतीय पुष्प (३ ऑगस्ट, दुपारी १२:३० वा.):

स्थळ: अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ

वक्ते: प्रा. समाधान इंगळे (गेवराई, बीड)

विषय: ‘माय-बापाला समजून घेऊ या’

असे आहेत विचारपीठावरील वक्ते:
१) प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी (धुळे): धुळ्याच्या SSVPS महाविद्यालयात कार्यरत. तीन काव्यसंग्रह व एक लेखसंग्रह प्रकाशित. 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटासाठी खान्देशी संवाद लेखन आणि भाषा मार्गदर्शक म्हणून काम.

२) विशाल उशिरे व भगवान खोंदले: विशाल उशिरे हे समाजभान जपणारे कवी असून त्यांची ‘बाप’ कविता विशेष प्रसिद्ध आहे. तर भगवान खोंदले हे पेशाने डिझाइन इंजिनिअर असून शेतीमाती आणि विनोदी कविता सादरीकरणासाठी राज्यभर ओळखले जातात.

३) प्रा. समाधान इंगळे (बीड): गेवराई येथील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक. नामवंत कवी, वक्ते आणि शाहीर म्हणून महाराष्ट्रभर कार्यक्रम गाजलेले आहेत. प्रगतिशील लेखक संघाचे ते उपाध्यक्षही आहेत.