भुसावळ (प्रतिनिधी ) – पेट्रोल-डिझेल दरवाढ, इंधन तुटवडा, NEET पेपरफुटी, शेतकरी कर्जमुक्ती, शैक्षणिक फी वाढ तसेच शेती साहित्यावरील कर यांसारख्या जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार नीता लबडे यांना शहरप्रमुख गणेश सुरेश चौधरी (सोनवणे) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच NEET परीक्षेचे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून नैराश्यातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना संतापजनक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय पेरणी हंगाम तोंडावर असताना बियाणे, खते, शेती अवजारे व यंत्रांच्या वाढलेल्या किमतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निवेदनात म्हटले आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरत असून अद्याप निकष स्पष्ट नसल्याने शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात अडचणी येत असल्याची टीका करण्यात आली. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही शाळांकडून अवाजवी फी आकारणी, पुस्तके व गणवेश खरेदीची सक्ती केली जात असल्याने शिक्षणाचे बाजारीकरण होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या :
पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ तात्काळ मागे घेऊन इंधनाचा सुरळीत पुरवठा करावा. NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांची परीक्षा फी कायमस्वरूपी माफ करावी.आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व एका सदस्यास सरकारी नोकरी द्यावी.शेती साहित्य, बियाणे व खते करमुक्त करून आवश्यकतेनुसार अनुदान द्यावे.शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित लागू करून १ जूनपूर्वी पीककर्ज वाटप सुरू करावे.शाळांकडून होणारी अवाजवी फी आकारणी, पुस्तके व गणवेश सक्ती रोखून शिक्षण विभागाने कठोर कारवाई करावी.
मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास शिवसेना पक्षातर्फे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी तालुकाप्रमुख हेमंत पुरुषोत्तम ब-हाटे , विधानसभा क्षेत्र प्रमुख तोरण महाजन विधानसभा संपर्क प्रमुख ललित मुथा, नबीदादा पटेल – उप शहर प्रमुख , विशाल अत्रे , राकेश खरारे उप शहर प्रमुख यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते.


