भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; महसूल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

भडगाव( प्रतिनिधी) –
राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात भडगाव तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या निर्णयानुसार मंगळवार, दि. २१ एप्रिल २०२६ पासून तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) तसेच मंडळ अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेतनवाढ, सेवा अटींमध्ये सुधारणा तसेच इतर प्रलंबित प्रशासकीय मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या संपामुळे महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः सातबारा उतारे, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्रे तसेच इतर महत्त्वाच्या महसुली सेवांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कागदपत्रांसाठी पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

संप किती काळ चालणार याबाबत अद्याप अनिश्चितता असून, शासन व कर्मचारी संघटनांमध्ये लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.