हुडको कॉलनीत पाणीटंचाई तीव्र; नागरिकांची नियमित पुरवठ्याची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवशक्ती हुडको कॉलनी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. परिसरात तब्बल १० ते १२ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाण्याची गरज वाढली असताना, नगरपालिकेच्या अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांना पाणी साठवून काटकसर करावी लागत आहे. पाणी संपल्यानंतर पुन्हा पाण्यासाठी धावपळ करावी लागते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही भागात सलग तीन ते चार दिवस पाणी सोडले जात असून ते गटारीत वाहून जात आहे, तर काही ठिकाणी केवळ चार तासच पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे उंच भागातील घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

या संदर्भात पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पाणीपुरवठा सभापतींकडूनही दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

भुसावळ शहरातील आणि विशेषतः हुडको परिसरातील नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन नगरपालिका मुख्याधिकारी, तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी तातडीने लक्ष घालून नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. जास्वंदी भंडारी यांनी केली आहे.