भुसावळ (प्रतिनिधी) : सनातन धर्माचे जतन, सामाजिक समरसता आणि हिंदू जनजागृतीच्या उद्देशाने भुसावळ येथील विठ्ठल मंदिर वॉर्डात ‘हिंदू संमेलन’ उत्साहात पार पडले. या प्रसंगी शिंदखेडा येथील गुरु गोरक्षनाथ आखाड्याचे योगी दत्तनाथ महाराज आणि रा.स्व. संघाचे देवगिरी प्रांत सहकार्यवाह डॉ. रमेश जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मुलींनो, बाह्य सौंदर्यापेक्षा शक्तीची उपासना करा!
योगी दत्तनाथ महाराजांनी आपल्या तडाखेबंद भाषणात लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर पालकांना सावध केले. ते म्हणाले, “मुलींनी केवळ सौंदर्याच्या मागे न लागता लाठी-काठी आणि कराटेचे प्रशिक्षण घ्यावे. झाशीची राणी आणि जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मुलगी ‘दुर्गा’ झाली पाहिजे. स्वसंरक्षणासाठी मुलींनी आपल्या पर्समध्ये पाच इंची चाकू आणि मिरची स्प्रे ठेवावा.” महाराष्ट्रातील लेकी-बाळींच्या तस्करीच्या संकटावरही त्यांनी यावेळी तीव्र चिंता व्यक्त केली.

पंच परिवर्तना’तून समाज घडवा
डॉ. रमेश जाधव यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर भर देत जातीभेद गाडून एकसंध हिंदू समाज निर्माण करण्याचे आवाहन केले. “कुटुंब व्यवस्था आणि अध्यात्म जपण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. स्वभाषा, स्वदेशी वेशभूषा, स्वदेश भ्रमण आणि पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी नमूद केले. केवळ अधिकारांची भाषा न करता कर्तव्याचे पालन करून देशाला उच्चस्थानी नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाची वैशिष्ट्ये
कार्यक्रमाची सुरुवात नुपूरच्या गणेश वंदनेने आणि भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी भव्य कलश यात्रा काढून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले, तर पसायदानाने सांगता झाली. या संमेलनास परिसरातील नागरिक, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल मंदिर वार्ड हिंदू समिती ने परिश्रम घेतले.



