भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य प्रदेशातील खंडव्याजवळ शुक्रवारी पहाटे भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वरणगाव फॅक्टरी परिसरात शोककळा पसरली आहे.

ही दुर्घटना खंडव्याजवळील बोरगाव परिसरात शुक्रवारी सकाळी सुमारे ५ वाजता घडली. अपघातात श्याम विक्रम ठाकूर (वय ४५), शोभा विक्रम ठाकूर (वय ६०) आणि शिवन्या श्याम ठाकूर (वय ५) यांचा मृत्यू झाला. तसेच अन्य चार भाविक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण उज्जैन आणि ओंकारेश्वर व सिहोर येथील दर्शन करुन घरी परत येत असताना हा भीषण अपघात घडला. कार श्याम ठाकूर चालवत होते. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात
घडल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. अपघातात श्याम ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या त्यांच्या आई शोभाबाई ठाकूर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लहानगी शिवण्या हिला बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. हे कुटुंब भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील दर्यापूर शिवारात राहत
होते. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत ठाकूर कुंटुबीय हे मूळ यावल तालुक्यातील शिरसाड साकळी येथील रहिवासी असून त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर ठाकूर हे वरणगाव फॅक्टरीत नोकरीला आहे. उर्वरित जखमींवर सध्या उपचार सुरु असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी मध्य प्रदेशातील स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.


