काहुरखेड्यात मोठी कारवाई: कट्टा, काडतुसे आणि तलवारीसह दोन जण ताब्यात

भुसावळ ( प्रतिनिधी )
शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या काहुरखेडा गावात पोलिसांनी अतिशय धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या दोन इसमाला रंगेहात पकडले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

दि. ११ एप्रिल २०२६ रोजी वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांना गुप्त माहिती मिळाली की, काहुरखेडा गावातील तलाव परिसरात एक इसम शासनाने बंदी घातलेली अग्निशस्त्रे व तलवार बाळगून केकोणत्यातरी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत आहे. माहितीची गंभीरता ओळखून त्यांनी तत्काळ पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले.

पोलीस उपनिरीक्षक एम.के. बेंडकोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार यासिन पिंजारी, गोपीचंद सोनवणे, इक्बाल शहा व प्रशांत ठाकुर यांच्या पथकाने मानपूर रोडवरील सोलर प्लांटजवळील तलाव परिसरात, शंकर मंदिराजवळ सापळा रचला. काही वेळातच संशयित हालचाली करणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव अशोक जगन्नाथ कोळी (वय ६८, रा. मांगलवाडी ता. रावेर, सध्या रा. काहुरखेडा) अरुण लक्षण चावरे वय २० वय राहणार काहुरखेडा असे असून त्याच्या अंगझडतीत कमरेला लपवून ठेवलेला गावठी कट्टा, दोन मॅगझीन आणि जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी पुढील तपास करत त्याच्या राहत्या पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता अधिक धक्कादायक बाब समोर आली. घरातील पिठाच्या चक्कीत लपवून ठेवलेला आणखी एक गावठी कट्टा, मॅगझीनसह जिवंत काडतुसे तसेच गादीखाली ठेवलेली धारदार स्टीलची तलवार जप्त करण्यात आली. शस्त्रसाठ्याचा हा प्रकार पाहता आरोपी कोणत्या मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत होता, याबाबत संशय अधिक गडद झाला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल इक्बाल मजिद शहा यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत कलम ३/२५, ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, १२ एप्रिल २०२६ रोजी त्याची रवानगी जिल्हा कारागृह, जळगाव येथे करण्यात आली आहे.