जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात मुंबई–नागपूर महामार्गावर भीषण अपघात घडला असून भरधाव वेगात राँग साईडने आलेल्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार मजुरांना जोरदार धडक दिली. या अपघातात चारही मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना हरताळा फाटा परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गालगत काही मजूर कामानिमित्त उभे होते. त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अर्टिगा कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की चारही मजूर रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, अपघातग्रस्त कारची तपासणी करताना पोलिसांना काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. कारवर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट लावण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच गाडीत पोलिसांच्या काठ्या आणि ड्रेस सापडल्याने या प्रकरणाबाबत अधिक संशय निर्माण झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या अपघातामागील नेमके कारण काय आणि कारमधील संशयास्पद वस्तूंचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.


