भुसावळमध्ये शिवमहापुराण कथेत एकतेचा संदेश : पंडित मिश्रा यांचे आवाहन – जाती-पाती विसरून समाजाने एकत्र यावे

भुसावळ (प्रतिनिधी ) – तापी नदीच्या किनारी अकलूज येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवमहापुराण कथेच्या दुसऱ्या दिवशी पंडित मिश्रा यांनी समाजात एकता राखण्याचे आवाहन केले. मतांच्या राजकारणासाठी काही राजकीय पक्ष समाजात जाती-जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी समाजाने या भूलथापांना बळी न पडता जाती-पाती विसरून एकत्र राहावे, असे आवाहन केले.

कथेच्या दुसऱ्या दिवशी लाखो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे ४० अंश तापमानाची प्रचंड उष्णता असतानाही दुपारी २ ते ५ या वेळेत कथास्थळी उभारलेला विशाल मंडप भाविकांनी हाऊसफुल केला होता. जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून आलेले विविध समाजातील लोक एकत्र बसून कथा ऐकत होते. येथे सुरू असलेल्या विशाल भंडाऱ्यातही कोणी कोणाची जात विचारत नसल्याचे उदाहरण देत पंडित मिश्रा यांनी समाजातील ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले.

सनातन धर्म श्रेष्ठ असल्याचे सांगताना त्यांनी काही लोक मूर्तीपूजेवर टीका करतात, मात्र हिंदूंच्या अनेक पूजा-विधींना विज्ञानानेही मान्यता दिली असल्याचे नमूद केले. एखाद्या असाध्य रोगावर उपचार करताना डॉक्टर शेवटी ‘आता सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे’ असे म्हणतात, यावरून परमात्म्याची शक्ती किती मोठी आहे हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

आजच्या युगात आपल्या अपयशाचे कारण इतर कोणी नसून आपण स्वतःच असतो. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार स्वीकारल्यास जीवनात यश मिळते. प्रत्येक माणूस स्वतःच्या यशाचा शिल्पकार आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोणालाही कमी समजू नये, कारण जीवनाचा भरोसा नसतो आणि कोणाशी केव्हा काम पडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे चांगले कर्म करणे अत्यंत महत्त्वाचे असून कर्माचा हिशोब नक्कीच होत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जीवन क्षणभंगुर असल्याने नित्यनेमाने शिवपूजा करावी. दररोज शिवाला एक लोटा जल अर्पण करावे, असे आवाहन त्यांनी भाविकांना केले. तसेच हरिचंदन व शिवचंदनाचे महत्त्वही त्यांनी सांगितले. तुळशीच्या सुकलेल्या फांदीपासून तयार होणारे चंदन हरिचंदन, तर बेलाच्या सुकलेल्या फांदीपासून तयार होणारे चंदन शिवचंदन म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कथे दरम्यान शिवपूजनाने व पंडीतजी मिश्रा यांच्या सांगितलेल्या उपाय केल्याने आलेले अनुभव पत्रांच्या माध्यमातून लिहून पाठवले भाविकांचे पत्र पंडितजी वाचन करून दाखवत होते.तर पंडितजी यांचे सुमधुर वाणी ने सादर शिव भक्ती भजनांवर नृत्य करून भाविक तल्लीन होऊन थिरकत होते. श्री शिवाय नमस्तुभ्यम , हर हर महादेव , जयघोषाने परिसर शिवमय झालेला दिसून येत आहे.

संत गजानन महाराज मंदिर येथे सुरू असलेला भंडारा, तेथील स्वच्छता आणि सेवाधाऱ्यांची शिस्त प्रशंसनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कथेसाठी अनेक भाविक दुपारी बारा वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी येत होते, तर काही भाविक सात दिवसांसाठी येथे मुक्कामी आहेत. भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्थांकडून निशुल्क चहा, पाणी, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अहोरात्र सेवेकरी भाविकांची सेवा करत असून येथे विशाल भंडारा सुरू आहे.

साईभक्त पिंटू कोठारी भंडारा कक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत. कार्यक्रमाचे आयोजक रतन भोई व त्यांच्या परिवाराने आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. सेवाधारी स्वयंसेवक तसेच पोलीस यंत्रणेनेही चोख व्यवस्था ठेवली आहे.

पंडित मिश्रा यांची शिवमहापुराण महाकथा १५ मार्चपर्यंत दररोज दुपारी २ ते ५ या वेळेत होणार असून १६ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समारोपीय कथा होणार आहे.