महाराष्ट्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट; नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी

महाराष्ट्र राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ९ आणि १० मार्च या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये अत्यंत उष्ण हवामान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये ९ मार्च रोजी तीव्र उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच १० मार्च रोजीही या भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा त्रास जाणवू शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातही अत्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील काही भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय नाशिक, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसह काही भागांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील काही प्रमुख शहरांतील तापमान (°C):

विदर्भ
अकोला – 40.8°C
अमरावती – 40.6°C
वर्धा – 40.0°C
नागपूर – 38.7°C
यवतमाळ – 39°C
चंद्रपूर – 39.2°C
वाशीम – 39.2°C
भंडारा – 38.8°C
गोंदिया – 38.6°C
गडचिरोली – 38°C

उत्तर महाराष्ट्र
जळगाव – 38°C
धुळे – 37°C
नंदुरबार – 36.5°C
नाशिक – 36.6°C

मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर – 37.5°C
जालना – 37°C
परभणी – 38°C
हिंगोली – 37°C
नांदेड – 38.5°C
बीड – 37°C
लातूर – 36.5°C
धाराशिव – 36.5°C

पश्चिम महाराष्ट्र
पुणे – 37°C
सोलापूर – 38.8°C
सातारा – 35°C
सांगली – 37°C
कोल्हापूर – 34°C

कोकण
मुंबई – 34°C
ठाणे – 34°C
पालघर – 33°C
रायगड – 34°C
रत्नागिरी – 33°C

दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे वापरावेत तसेच उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.