मार्चच्या सुरुवातीलाच भुसावळात उन्हाचा तडाखा !तापमान ४०.५ अंशांवर; दुपारी रस्त्यांवर वर्दळ मंदावली

भुसावळ (प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात तापमानासाठी हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुसावळ शहरात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेचा तीव्र तडाखा जाणवू लागला आहे. गुरुवारी (५ मार्च) शहराचे कमाल तापमान ४०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. यंदाच्या उन्हाळ्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक तापमान नोंद ठरली आहे.

गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून त्याचा परिणाम शहरातील जनजीवनावर जाणवत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील मुख्य रस्ते तुलनेने सामसूम दिसत होते. अनेक नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी छत्रीचा वापर केला.

दुपारी तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडल्याने मुख्य बाजारपेठ तसेच रेल्वे स्थानक परिसरातील वर्दळही कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याचे दिसून आले.

मार्चमध्येच ‘मे हीट’चा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात भुसावळकरांना मे महिन्यासारख्या उष्णतेचा अनुभव येऊ शकतो. कमाल तापमान ४२ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. .