उन्हाळ्यात शाळांच्या वेळेत बदल आवश्यक; माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्याप परिपत्रक दिले नाही – शिक्षक संघटना नाराज

भुसावळ (प्रतिनिधी ) – मार्च महिना सुरू होताच जिल्ह्यातील शाळांमध्ये उन्हाचा तीव्र त्रास जाणवू लागतो. दरवर्षी या काळात माध्यमिक आणि प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचे परिपत्रक शिक्षण अधिकाऱ्यांकडून जारी केले जाते. या वर्षी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडत, प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करणारे परिपत्रक निर्गमित केले आहे.

तथापि, माध्यमिक शाळांसाठी अद्याप वेळेत बदल सुचविणारे परिपत्रक शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी जारी केलेले नाही, ज्यामुळे माध्यमिक शाळांतील विद्यार्थी उन्हाच्या तडाख्याचा सामना करत आहेत. अनेक शिक्षक आणि शाळांचे मुख्याध्यापक या बाबतीत नाराज आहेत आणि विचारतात, “केवळ प्राथमिक शाळेतील मुलांवरच उन्हाचा त्रास होतो का?”

मुख्याध्यापकांनी आपल्या अधिकारात शाळेची वेळ बदलून दुपारी ऐवजी सकाळी ११–१२ पर्यंत ठेवली आहे. मात्र, त्यामुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये एकसूत्रीपणा हरवला आहे. काही शिक्षकांना अशी शंका आहे की शिक्षणाधिकारी कामाच्या व्यापात वेळेचा परिपत्रक जारी करायला विसरले असावे.

शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते प्र. ह. दलाल यांनी शाळांच्या वेळेत बदल करून लहान मुलांच्या आरोग्याचा आणि परीक्षेच्या काळातील सुरक्षिततेचा विचार करून, माध्यमिक शाळांसाठी त्वरित परिपत्रक जारी करण्याची मागणी केली आहे.