भुसावळ न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी): येथील न्यायालय आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वर्ग २ चे जिल्हा न्यायाधीश श्री. एस. बी. हेडाऊ उपस्थित होते. तसेच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वर्ग ३ चे श्री. एस. आर. यादव , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. एम. कुलकर्णी , श्रीमती के. एम. पत्रे , प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. बागडे , प्रथम वर्ग दंडाधिकारी जी. बी. पवार , जयंती उत्सव समिती अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र महाजन, भुसावळ बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. तुषार पाटील, लीगल प्रॅक्टिशनर बारचे कैलास लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी न्यायालय परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. भूपेश बाविस्कर यांनी केले.

यावेळी मान्यवरांनी शिवरायांच्या जीवनातील विविध ऐतिहासिक प्रसंगांचे स्मरण करून शून्यातून उभारलेल्या स्वराज्याची प्रेरणादायी गाथा उलगडली. जिजामाता यांनी बालपणी दिलेले संस्कार, महाराजांची युद्धनीती, शेती व आरमार धोरण, स्त्रियांना दिलेला सन्मान, विविध किल्ल्यांची निर्मिती आणि राज्याभिषेक सोहळा यांचा आढावा घेण्यात आला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पवयातच स्वराज्यात लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था निर्माण केली. न्याय, समता आणि बंधुतेच्या तत्त्वांवर आधारलेले हिंदवी स्वराज्य उभारून लोकशाहीची बीजे रुजवली. स्वराज्यात स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची स्पष्ट दंडक व्यवस्था होती, याचा उल्लेख त्यांनी केला.

तसेच रयत आणि सैन्य सुरक्षित राहावे यासाठी दूरदृष्टीने निर्णय घेतल्याचे उदाहरण म्हणून पुरंदरचा तह याचा उल्लेख करण्यात आला. किल्ले परत जिंकता येतील, मात्र माणसे परत येणार नाहीत, ही जाणीव ठेवून घेतलेले निर्णय हे महाराजांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात बालकलाकार कुमारी यशस्विनी बाविस्कर तसेच अ‍ॅड. नेमाडे दादा, अर्जुन पाटील, अ‍ॅड. धीरज शंकपाळ, अ‍ॅड. सुनील पगारे, अ‍ॅड. जास्वंदी भंडारी, अ‍ॅड. रमेश पांडव, अ‍ॅड. प्रकाश मोझे, अ‍ॅड. सुशील बर्गे, अ‍ॅड. तुषार पाटील व अ‍ॅड. एम. एस. सपकाळे यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमास वकील संघातील वरिष्ठ, कनिष्ठ व महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन अ‍ॅड. प्रफुल्ल पाटील यांनी केले.