रावेर ( प्रतिनिधी )-

“अजितदादांचे अशा अपघातात जाणे आजही मनाला पटत नाही. स्पष्टवक्ते, निर्भीड आणि निर्मळ असा एक कर्तृत्ववान नेता आपण गमावला आहे. सत्ता ही जनसेवेसाठी कशी वापरावी, विकास कसा असतो आणि कामांची गुणवत्ता कशी असावी, याबाबत त्यांनी दिलेले मोलाचे मार्गदर्शन आयुष्यभर स्मरणात राहील,” असे भावपूर्ण उद्गार आमदार अमोल जावळे यांनी काढले.
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, रावेर येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. स्वर्गीय हरिभाऊ जावळे आणि अजितदादांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. काम करताना गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये, असा कानमंत्र अजितदादांनी नेहमी दिला, असेही आमदार जावळे यांनी सांगितले.
या शोकसभेला माजी आमदार शिरीष चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पद्माकर महाजन, सुरेश धनके, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक दारा मोहम्मद जफर मोहम्मद, उपनगराध्यक्ष आशिफ मोहम्मद, बाजार समितीचे संचालक डॉ. राजेंद्र पाटील, वसंत महाजन, योगीराज पाटील, सोपान साहेबराव पाटील, रमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, किशोर पाटील, सोपान पाटील, प्रल्हाद महाजन, हरिष शेठ गणवाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, उपनगराध्यक्ष आशिफ मोहम्मद, नगरसेवक पद्माकर महाजन, योगीराज पाटील आणि राजीव पाटील यांनीही स्वर्गीय अजित पवार यांच्या सामाजिक, राजकीय व विकासात्मक कार्याचा गौरव करत श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणित महाजन व दीपक पाटील यांनी केले.


