समस्या, कल्पकता, धडाडी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर उद्योजकतेचे शिखर पार करता येते गरज आहे सकारात्मक दृष्टिकोनाची – डॉ नवीन खंडारे :


भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच नव तंत्रज्ञान कौशल्य अभियान कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ पुरस्कृत सेंटर फॉर इनोव्हेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस आणि भोळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग करिअर गायडेन्स समिती अंतर्गत आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन इंक्युबेशन, इनोव्हेशन अँड लिंकेजेस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नवीन खंडारे यांचे हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माजी व्यवस्थापन परिषद, सिनेट, व विद्या परिषद सदस्य प्राचार्य डॉ. आर. पी. फालक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक कु. रोशनी जैन आणि मार्गदर्शक म्हणून उद्योजक श्री राजेश चौधरी आणि कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. संजय चौधरी हे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी विद्यापीठ क्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधून कार्यशाळेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना उद्योग व्यवसायाकडे वळण्याची आवश्यकता का निर्माण झाली हे स्पष्ट करून सांगत असताना अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकणे, समस्येकडे तक्रार म्हणून नव्हे, तर संधी म्हणून पाहणे, “हे होणार नाही” पेक्षा “हे कसं होईल?” असा विचार करणे म्हणजे उद्योजकीय मानसिकता असते असे सांगून,
आज उद्योजकता म्हणजे फक्त स्वतःचा व्यवसाय सुरू करणे एवढेच नाही तर आज स्टार्ट-अप इकोसिस्टीममध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत त्या ओळखून स्टार्ट-अपमध्ये काम करणे हे आहे असे सांगितले तसेच
इनोव्हेशन, रिसर्च, मार्केटिंग, टेक्नॉलॉजी, सोशल एंटरप्रायझेस,ग्रामीण व सामाजिक स्टार्ट-अप्स या बद्दल आज सहज माहिती उपलब्ध आहे आणि शासनाचा दृष्टिकोनही सकारात्मक आहे
म्हणूनच आजचा विद्यार्थी फक्त नोकरी शोधणारा न राहता
नवीन वाटा शोधणारा, संधी घडवणारा नागरिक बनला पाहिजे असे आवाहन केले
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. नवीन खंडारे यांनी आपल्या करिअर मधील अनुभव कथानकारीत संधी कशी निर्माण होते आणि त्याचे यशस्वी वाटचालीत कसे रूपांतर करावे या बद्दल मार्गदर्शन करीत असताना स्टार्ट अप साठी पैशांची गरज नसून कल्पकता, उद्योजकीय मानसिकता आणि आत्मविश्वास महत्वाचा असतो असे सांगितले. तसेच तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असताना नवीन कौशल्य शिकायची मानसिकता असेल तरच भविष्य सुरक्षित आहे हे सांगत आपले पॅशन आणि पेशन्स या दोन स्तंभांचा वापर करत उद्योजकतेच्या वाटेवर पुढे यावे. आपल्या मार्गदर्शनात डॉ. खंडारे यांनी भुसावळ आणि परिसराच्या ग्रामीण भागातील परिस्थिनुसार कोणते स्टार्टअप उत्तम प्रकारे विकसित होऊ शकतील याची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना इनोव्हेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस विभागाच्या कार्यके समन्वयक कु. रोशनी जैन यांनी विद्यापीठाच्या सदर विभागाची कार्यप्रणाली विस्तृत स्वरूपात स्पष्ट करीत असताना नागरिकांच्या कल्पनेपासून उद्योजक म्हणून उद्योग सुरू करणे आणि तो यशस्वीपणे सुरू होण्यापर्यंत लागणाऱ्या सुविधा, मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य या बद्दल विस्तृत माहिती दिली. त्यासाठी आवश्यक असणारे सगळे संपर्क क्रमांक आणि क्यू आर कोड यांची माहिती देऊन केंद्राशी संपर्क साधण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.
प्रमुख वक्ते म्हणून विद्यापीठाच्या इनोव्हेशन इंक्युबेशन अँड लिंकेजेस विभागाचे मार्गदर्शन करून यशस्वीपणे इंडस्ट्री सुरू केलेत धर्मादर्श डीहायड्रेटेड ऍग्रो फूड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक श्री राजेश चौधरी यांनी आपल्या निर्जलीकरण उद्योगाच्या कल्पनेपासून यशस्वीपणे उद्योग सुरू करेपर्यंतचा प्रवास आणि या दरम्यान विद्यापीठ केंद्राने वेळोवेळी दिलेल्या मदत आणि मार्गदर्शनाची माहिती दिली. तसेच आज जग कोठे चाललं आहे, आपण कोठे आहोत, आपल्या भागातील समस्या कोणत्या आहेत याचा विचार करून जिद्द बाळगत मोठा उद्योग सुरू करण्याचा निश्चय केला आणि त्यात या विभागाच्या मार्गदर्शनातून जळगाव जिल्यातील निर्जलीकरण विभागातील सर्वात मोठा स्टार्ट अप सुरू केल्याची माहिती दिली.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत उद्योजकीय मानसिकता व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करिअर, आयडिया ते स्टार्ट अप, कल्पना व्यवसायात रूपांतरित करण्याची प्रक्रिया, इंक्युबेशन सेंटरकडून स्टार्टअप साठी सहाय्य आणि स्टार्टअप प्रवास या अनुभव कथनाच्या विषयांवर मार्गदर्शन केले गेले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ दयाघन राणे यांनी, सूत्रसंचालन प्रा डॉ माधुरी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ जयश्री सरोदे यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल, के नारखेडे महाविद्यालय भुसावळ या महाविद्यालयातील 75 विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला तसेच सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस. डी. चौधरी, प्रा. डॉ. अंजली पाटील, प्रा. डॉ. जी. पी. वाघुळदे, प्रा आर डी भोळे, प्रा. डॉ. जगदीश चव्हाण, प्रा. डॉ. अनिल सावळे, प्रा दीपक जैस्वार, प्रा डॉ आर बी ढाके, प्रा. श्रेया चौधरी, प्रा. निर्मला वानखेडे, प्रा. संगीता धर्माधिकारी प्रा गायत्री नेमाडे,प्रा सुशीला भाटे, प्रा अश्विनी भाग्यवंत,प्रा कामिनी चौधरी, प्रा खिलचंद धांडे, प्रकाश चौधरी, राजेश पाटील, सुधाकर चौधरी, विजय पाटील, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, दीपक महाजन यांनी कार्यालयीन कर्मचारी उपस्थित राहून सहकार्य केले.