जळगाव प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्याने आता कडाक्याच्या थंडीची चाहूल घेतली असून, तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. ‘आयएमडी’ (IMD) नुसार, शुक्रवारी जळगाव शहराचे किमान तापमान संपूर्ण राज्यात सर्वाधिक कमी, म्हणजेच १२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने थंडीचे प्रमाण कमी होते. मात्र, ५ नोव्हेंबरपासून ढगाळ वातावरण कमी होताच, थंडीने जोर पकडला आहे गेल्या दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे. ५ नोव्हेंबर रोजी रात्रीचे तापमान २१ अंश सेल्सिअस होते, जे ७ नोव्हेंबर रोजी थेट १२ अंशांवर खाली आले. म्हणजेच, अवघ्या दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात तब्बल ९ अंशांनी घट झाली आहे.
कडाक्याच्या थंडीसोबतच जिल्ह्यात पहाटेच्या वेळेस दाट धुक्याचे प्रमाण देखील वाढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या जिल्ह्यात हवामान पूर्णपणे कोरडे असल्यामुळे उत्तरेकडील थंड वारे अधिक सक्रिय होतील, ज्यामुळे आगामी काळात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.


