वाघुर नदीचा सुनसगाव – नशिराबाद पुलावरुन पाणी गेल्याने संपर्क तुटला.


सुनसगाव ता भुसावळ । वार्ताहर – येथून जवळच असलेल्या वराडसिम वाघुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने धरण १०० टक्के भरल्याने दि.१६ रोजी सकाळी ८ वाजता धरणाचे २ दरवाजे अर्धा मिटर ने उघडण्यात आले त्यानंतर १० वाजता ६ दरवाजे १ मिटर ने उघडण्यात आले असे दुपारी १ वाजे दरम्यान २० दरवाजे १ मिटर ने उघडण्यात आल्याने वाघुर नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला असल्याने सुनसगाव नजिक वाघुर नदीवर नशिराबाद – सुनसगाव दरम्यान बांधण्यात आलेला पूल पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरुन वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलावरुन पाणी गेल्याने नशिराबाद – सुनसगाव या गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कुऱ्हा पानाचे येथूनच भुसावळ मार्गे वळविण्यात आली.

पुलावरुन पाणी जाताच सुनसगाव पोलीस पाटील खुशाल पाटील व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी महसूल व पोलीस प्रशासनाला माहिती दिली त्यामुळे नशिराबाद पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी , सर्कल ,तलाठी तसेच भुसावळ तालुका पोलीस अधिकारी ,तलाठी ,ग्रामपंचायत अधिकारी ,पदाधिकारी ,तंटामुक्ती अध्यक्ष प्रविण चौधरी यांनी घटनास्थळी दाखल होऊन पर्यायी व्यवस्था केली. याच पुलाजवळ सध्या रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे गावाकडे पाणी येते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या चार वर्षा नंतर पुन्हा एकदा या पुलावरुन पाणी गेल्याने पूर पाहण्यासाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आता पाणी ओसरल्यावर पुलाची साफसफाई करावी लागेल त्या नंतरच वाहतूक सुरु होईल असे सांगण्यात येत आहे.