जळगाव : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी 850 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या टास्क फोर्स आढावा बैठकीत महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली.

या योजनेतून जिल्ह्यातील 153 उपकेंद्रांद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार असून, सध्या 68 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी लोकसंवाद, सहकार्य आणि जनजागृती यावर भर द्यावा, असेही श्री. चंद्र यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणारी ही योजना देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरत आहे. पुढील वर्षभरात भारतातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून तब्बल 16,000 मेगावॅट वीज शेतीसाठी दिवसा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी सौर प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक शासकीय आणि खाजगी जमिनीची उपलब्धता, भूसंपादनाची पूर्तता आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ग्रामसभांमधून सौर योजनांचा प्रसार करावा
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, आणि मागणीवर आधारित सौर कृषीपंप योजना यांचा प्रभावी प्रसार व अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपातळीवर जनजागृती महत्त्वाची आहे. स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांमध्ये या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन श्री. चंद्र यांनी यावेळी केले.


