भुसावळ (प्रतिनिधी ) –

राज्यात १०० दिवसांची ‘कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीमेत अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसादयांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी व चमूचे मनःपूर्वक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .
राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक पद्धतीने चालावे याकरिता दिनांक ७ जानेवारी, २०२५ ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १०० दिवसांची ‘कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आज दिनांक २७ फेब्रुवारी, २०२५ रोजी आढावा घेण्यात आला. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव , प्रधान सचिव , सचिव, आयुक्त/संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/ उप महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर (AI), नाविन्यपूर्ण उपक्रम, इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी ही १०० दिवसांची विशेष मोहीम पूर्ण होणार आहे. ही मोहीम यापुढे अधिक व्यापक व प्रभावीपणे राबवून, जिल्हाधिकारी यांचे हातून अशीच नेत्रदीपक कामगिरी होत राहावी याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत .


