प्राईम बुक्स – पब्लिशिंग हाऊसचे दिमाखदार उदघाटन संपन्न :

जळगाव – जळगाव ही कवी लेखकांची भूमी आहे. बहिणाबाई, बालकवी, भालचंद्र नेमाडे ते शीतल पाटील अशी एक समृद्ध साहित्य परंपरा या भूमीला लाभली आहे. साहित्य लेखन, वैचारिक लेखन, शैक्षणिक लेखनातही जळगाव मागे नाही. या परंपरेचे जतन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी खान्देशातील अक्षरांना प्रज्ज्वलित करण्यासाठी जळगावातील प्रकाशन संस्थांनी मौलिक असे काम जबाबदारीने पाडले आहे. या परंपरेत प्राईम पब्लिकेशन हाऊसचे गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी साहित्य प्रकाशनाचे नवे पर्व सुरू झालेले आहे. या प्रकाशनाचे प्रकाशक प्रदीप पाटील यांनी ही धुरा खांद्यावर घेतलेली आहे.
21 जुलै रोजी जळगावच्या स्वातंत्र्य चौकात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते या प्रकाशन संस्थेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानाला वंदन करून संपन्न झाले.

याप्रसंगी जिजामाता फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष पी.ई. तात्या पाटील, अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ, जळगावचे अध्यक्ष प्रा. ए.पी. चौधरी, दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी, सुप्रसिद्ध कवी आणि माजी विभागीय सचिव शशिकांत हिंगोणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रकाशनाचे निर्मिक प्रदीप पाटील यांनी ही केवळ प्रकाशन संस्था नसून खान्देश साहित्य संस्कृती परंपरा जपण्याचे आणि प्रकाशित करण्याचे बांधिलकीचे प्रयत्न असल्याचे सांगितले. नवे प्रतिभावंतांचे साहित्य शोधणे, नवे शिक्षण क्षेत्रातील संशोधने निवड करणे आणि प्रकाशित करणे हे कर्तव्य मानले आहे. याचबरोबर पी.ई. तात्या अभ्यासिकाही जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांना ग्रंथ उपलब्ध करून देऊन त्यांचे आयुष्य उभारण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही सामाजिक बांधिलकीची भूमिका स्वीकारून नवा समाज घडवण्याचे काम नम्रपणे करणार असल्याचे सांगितले.
शशिकांत हिंगोणेकर यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, हे प्रकाशन नव्हे तर नवे हक्काचे गुणवत्ता संवर्धनाचे प्रकाशमय दालनच शहरात उघडले आहे. यामुळे खान्देशच नव्हे तर महाराष्ट्र साहित्य क्षेत्राला नवसंजीवनी देणारे हे कर्तव्य आहे. अध्यक्षीय मनोगतात पी.ई. तात्या पाटील म्हणाले की, प्रदीप पाटील यांचे हे प्रकाशन ज्ञानाचे भांडारच आहे. होतकरू विद्यार्थ्यांना घडवणारे समृद्ध दालन आहे. समाजाने या प्रकाशन संस्थेच्या पाठीशी उभे राहून हा ज्ञानाचा महायज्ञ अखंड सुरू ठेवावा.
नवलेखक विनोद अहिरे यांनी या प्रकाशनाच्या वतीने हे म्हणजे नव्या प्रतिभेसाठी नवसंजीवनच असल्याचे गौरवोद्गार काढले. या प्रसंगी शिक्षणतज्ञ चंद्रकांत भंडारी, प्रा. गोपाल दर्जींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अनोख्या कार्यक्रमाचे लक्षवेधी सूत्रसंचालन कवयित्री ज्योती वाघ यांनी केले.