जळगाव जिह्यातील चौघे स्थानबद्ध : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश -रावेरच्या तिघांसह पाचोरा तालुक्यातील एकाचा समावेश : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांवर प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा वरवंट फिरवला आहे. सामाजिक स्वास्थाला धोकेदायक असलेल्या चौघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यात रावेर तालुक्यातील तिघांची तर पाचोरा तालुक्यातील लोहारीचा एकचा समावेश आहे. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबत आदेश पारीत केले आहेत. दोघांची ठाणे कारागृहात तर दोघांची मुंबई कारागृहात रवानगी करण्यात आली.
रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगार शेख तौसीफ शेख अफजल (28, रा.फतेह नगर, रावेर), अयुब बशीर तडवी (55, रा.कुसुंबा, ता.रावेर), मगन मुरलीधर करवले (43, रा.अटवाडे, ता.रावेर) यांच्यासह पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील मनोहर उर्फ मोहन उखर्डू कोळी (55, रा.लोहारी बुद्रुक, ता.पाचोरा) यांना स्थानबद्ध करण्यात आले. शेख तौसीफ वगळता इतर तिघांवर हातभट्टीवाला या संज्ञेत प्रस्ताव दाखल आहेत
शेख तौसीफ याच्यावर धोकादायक व्यक्ती म्हणून रावेर निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी प्रस्ताव एलसीबीकडे पाठवला तर अयुब तडवी व मगन करवले यांच्यावर हातभट्टीवाला संज्ञेत एलसीबीकडे प्रस्ताव दिलेले होते. पिंपळगाव हरेश्वर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी मनोहर कोळी याचा प्रस्ताव एलसीबीकडे दिलेला होता. प्रस्तावांचे अवलोकन केल्यावर हे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवार, 18 जुलै रोजी रात्री उशिरा चौघांवर स्थानबद्धतेची कारवाई केली. यातील तौसीफ शेख आणि मनोहर कोळी यांना ठाणे जिल्हा कारागृहात तर अयुब तडवी आणि मगन करवले यांना मुंबई कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
हे प्रस्ताव निरीक्षक डॉ. जयस्वाल आणि पिंपळगाव हरेश्वरचे एपीआय प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. प्रस्तावाचे अवलोकन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक फौजदार युनूस शेख, सुनील दामोदरे, जयंत चौधरी, रफिक शेख, ईश्वर पाटील यांनी केले.