भुसावळ – विनोदी व्यक्तिरेखांनी खळखळून हसवणारा अस्सल माणसं इरसाल नमुने हा एकपात्री प्रयोग हास्य कलाकार प्रभाकर निलेगावकर यांनी सादर केला. या एकपात्री प्रयोगातील विनोदी व्यक्तिरेखांनी श्रोत्यांमध्ये तब्बल दीड तास हास्यकल्लोळ उडाला.

भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयाच्या 154व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. 20 रोजी सकाळी सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपूजन करण्यात आले. त्यानंतर के. नारखेडे विद्यालयापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात के. नारखेडे विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. के. नारखेडे विद्यालयाच्या आवारात आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीशिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी.व्ही. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, तहसीलदार नीता लबडे, वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, मुख्याध्यापक नितीन किरंगे, डॉ. जगदीश पाटील, वाचनालयाचे ग्रंथपाल नितीन तोडकर, दिनकर जावळे, डॉ. म. सी. हळपे, स्वाती भोळे, वैशाली चौधरी आदींची उपस्थिती होती. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनानंतर वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकूर यांनी प्रास्ताविकातून सार्वजनिक वाचनालयाचा व वर्धापनदिनानिमित्त आयोजित तीनदिवसीय कार्यक्रमांचा आढावा घेतला. हास्य कलाकार प्रभाकर निलेगावकर यांचा परिचय डॉ. जगदीश पाटील यांनी करून दिला. तहसीलदार नीता लबडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे यांनी मनोगत तर अध्यक्षीय मनोगत पी.व्ही. पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ. संध्या भोळे यांनी तर आभार शिशीर जावळे यांनी मानले. वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत ठाकूर, ग्रंथपाल नितीन तोडकर, सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, सेवक होनाजी चौधरी, म्युनिसिपल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, हरीश पाटील, गुलाबराव पाटील, सोनू चिप्पड, विजय चौधरी, कैलास चव्हाण, अॅड. सतीश सरोदे, धोंडू पानसे, राहूल राणे, दिलीप चौधरी, मोहम्मद फारूख शेख, निसार बॅटरीवाला, जयश्री काळवीट, अमृता हळपे, अजय वाणी, डॉ. मिलिंद धांडे आदींचा सत्कार करण्यात आला. समारोपीय व्याख्यानाला के. नारखेडे विद्यालयातील विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, सार्वजनिक वाचनालयाचा वाचक वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
अस्सल माणसं इरसाल नमुने हा एकपात्री प्रयोग प्रभाकर एकनाथराव निलेगावकर यांनी तब्बल दीड तास सादर केला. त्यात त्यांनी नको ती माणसे, नाही त्या ठिकाणी भेटतात, त्यामुळे उडालेला गोंधळ आणि रेशीमगाठीने बांधलेली नाती सोडवता सोडवता आयुष्य संपून जाते, असे आपल्या खुमासदार शैलीतून सांगितले. आपल्या एकपात्री प्रयोगात त्यांनी बंडूला भेटलेले धाट सर, पिंट्या, भूगोलाचे मास्तर, आप्पासाहेब, म्हातारी, ग्रामीण बायका, मुकाभिनय, रावसाहेब, तबलावादक बुवा, चार बायका यासह लहान मूल, तरूण, पुरूष, महिला अशा विविध व्यक्तिरेखा उत्तमरित्या सादर केल्या.




