वरणगांवच्या सिध्देश्वर नगर भागातील सांडपाण्याच्या गटारी नित्कृष्ठ दर्जाच्या

महिन्याभराच्या कालावधीतच गटारी वरील ढाप्यांची लागली वाट , नगर परिषद लक्ष देणार का ?

वरणगाव : प्रतिनिधी
वरणगांव शहराच्या सिध्देश्वर नगर भागातील लहुजी साळवे नगर ( मातंगवाडा )परिसरात सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे काम करण्यात आले आहे . मात्र, महिनाभराच्या कालावधीतच नित्कृष्ठ दर्जाच्या गटारींची दुरावस्था झाली असून गटारीवरील तुटलेले ढापे मार्गक्रमण करणाऱ्या नागरीकांना त्रासदायक ठरत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे . तर नगर परिषद प्रशासन नित्कृष्ठ दर्जाच्या झालेल्या या कामाकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे .

वरणगांव शहराच्या सिध्देश्वर नगर भागात बहुतांश हातमजुरी करणाऱ्या विविध समाज बांधवाचा रहिवास आहे . या भागातील रहीवाशांची संख्या किमान तीन हजाराच्या वर असुन नगर परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी विविध योजनेतंर्गत या भागातील कामांना प्राधान्य दिले जाते . त्याच प्रमाणे प्रभाग क्रमांक १२ मधील लहूजी साळवे नगर ( मातंग वाडा ) भागात दलीत वस्ती सुधार योजनेंतर्गत सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी किमान ४०० – ५०० मिटर अंतरापर्यंत गटारीचे काम करण्यात आले आहे . मात्र, या भागातील इतर कामांप्रमाणेच महिना भरापूर्वीच तयार करण्यात आलेल्या या सांडपाण्याच्या गटारी तसेच त्यावरील सिमेंट काँक्रीटच्या ढाप्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे . यामुळे या भागातील गोरगरीब व हातमजूरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकलणाऱ्या येथील रहिवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे . तसेच नित्कृष्ठ दर्जाच्या झालेल्या या कामाची वरीष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी अशीही मागणी होत आहे .

मागासवर्गीय वस्तीतच नित्कृष्ठ दर्जाची कामे का?
लहूजी साळवे नगर ( मातंगवाडा ) या भागात हातमजुरी करणाऱ्या नागरीकांचा रहिवास असून या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत . त्यापैकी नगर परिषदेच्या वतीने दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गटारी व आवश्यक त्या ठिकाणी गटारीवर ढापे टाकण्याचे काम करण्यात आले . मात्र, अत्यंत नित्कृष्ठ दर्जाच्या झालेल्या कामामुळे महिना भराच्या कालावधीतच गटारी व ढाप्यांची दुरावस्था झाल्याने या भागातील नागरीकांना मार्गाक्रमण कठीण झाले आहे . यामुळे नित्कृष्ठ दर्जाची कामे मागासवर्गीय व गोरगरीब नागरीकांच्या वस्तीतच का? असा संतप्त सवाल केला जात आहे .

ठेकेदाराला पाठीशी घालणार का?
दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत या भागात करण्यात आलेल्या सांडपाण्याच्या गटारींची कामे भुसावळ येथील एका नामाकिंत राजकीय पक्षाच्या पुत्राने आपल्या देखरेखीखाली हे काम केले असल्याची चर्चा आहे . तर संबंधीत ठेकेदाराने आपल्या राजकीय पक्षाच्या बळावर आपल्या मनमानी पद्धतीने कामे केली असून हि कामे करतांना अनेक गोरगरीब रहिवाशांचे अतिक्रमणाच्या नावाखाली नुकसान केले तर काही रहिवाशांना मुभा देण्यात आल्यानेही या भागातील रहीवाश्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे . तसेच या गटारीचे सांडपाण्याचा निचरा हा नागारीक मार्गक्रमण करीत असलेल्या मार्गावरच होत असल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे . इतकेच नव्हे तर हे सांडपाणी या भागातील रहीवाशी प्लॉट धारकांच्या घराकडेही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . यामुळे नगर परिषद प्रशासनाने या कामाची सखोल चौकशी करून गोरगरीब जनतेला न्याय देण्याची भुमिका घेणार कि नित्कृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे .