मुक्ताईनगर – एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञानाचे मार्गक्रमण होत असताना यातील मध्यवर्ती दुवा गुरू-शिष्य परंपरा असते. आपल्या वारकरी संप्रदायाचा वारसा अखंडितपणे सुरू ठेवण्याचे काम संतांनी केलेले आहे. संतांच्या किंबहुना आदिशक्ती मुक्ताईंच्या आशीर्वादाने आपण आज यशस्वी वाटचाल करत आहोत. याच गुरू-शिष्य परंपरेमुळेच भक्तीचा प्रवाह अखंडितपणे सुरू आहे. गुरूंच्या उपदेशातून मिळालेले ज्ञान व त्याचा इतरांना लाभ करून घेण्यासाठी द्वेषाचा त्याग करावा व स्वप्रसिद्भी टाळावी, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन हभप शारंगधर महाराज मेहूणकर यांनी केले.

मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण येथील श्रीयज्ञेश्वर आश्रमात आजी-माजी विद्यार्थ्यांच्या व शिष्यांच्या वतीने गुरूपूजन सोहळा व पेढेतुला कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर आश्रमाचे अध्यक्ष गुरूवर्य शारंगधर महाराज मेहूणकर उपस्थित होते. यावेळी सुधाकर महाराज, नारायण महाराज, सुरेश महाराज, तुकाराम महाराज, लक्ष्मण महाराज, गणेश महाराज, ज्ञानदेव महाराज, शरद महाराज, निंबा महाराज, भरत महाराज, बबन महाराज, रतन महाराज, दत्तू महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि आदिशक्ती मुक्ताई व वै. भास्कर महाराज वड्रीकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविकात संभाजी महाराज मेहूणकर यांनी आश्रमातील आपला लहानपणापासूनचा अनुभव कथन करून माझ्यासारख्या अनेकांना मिळालेल्या ज्ञानाबद्दल गुरूंच्या ऋणातून उतराई होण्यासाठी किंबहुना आमचे काही बिघडू नये म्हणून आम्ही हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला असल्याचे सांगितले. सुधाकर महाराज यांनी शारंगधर महाराज यांच्या कार्याचा आढावा घेऊन मुक्ताई पालखीसाठी स्वखर्चाने आई-वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ पंढरपूरला जागा खरेदी केली असल्याचे सांगितले. वासुदेव महाराज महल्ले यांनी शारंगधर महाराजांच्या अध्यात्मिक कार्याचा गौरव केला. गणेश महाराज आळंदीकर यांनी महाराजांवर प्रेम करणाऱ्या भाविकांच्या भक्तीचा कळप तृप्त करणारा असल्याचे सांगितले. तुकाराम महाराज यांनी यज्ञेश्वर आश्रमात महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना मिळालेले शिक्षण आणि सध्या सुरू असलेला समाजोपयोगी वापर आनंददायी असल्याचे सांगितले. डॉ. जगदीश पाटील सर म्हणाले की, शारंगधर महाराजांनी केलेले अध्यात्मिक मार्गदर्शन व दिलेले मानसिक पाठबळ यातून मी पुन्हा उभा राहिला आहे. गुरूंच्या रूपात एक उत्कृष्ट मार्गदर्शक व आपल्या वाटचालीत वेळोवेळी दिशादर्शक ठरणारे गुरूवर्य शारंगधर महाराज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर श्रीयज्ञेश्वर आश्रमाचे आजी-माजी विद्यार्थ्यांनी पंचामृताने गुरूंची पाद्यपूजा करून पुष्पहार अर्पण केला. तसेच सर्वांच्या वतीने गुरूंना भेटवस्तू प्रदान केली. त्यानंतर ज्ञानेश्वर सूर्यवंशी, इंद्रपाल चौधरी व सुनील सावरकर यांनी दिलेल्या आर्थिक सहकार्यातून गुरूवर्य शारंगधर महाराज मेहूणकर यांची पेढेतुला करण्यात आली. त्यानंतर सत्कारार्थी मनोगत व्यक्त करताना सारंगधर महाराज म्हणाले की, वैकुंठवासी भास्कर महाराज वड्रीकर यांनी विश्वास दाखवून यज्ञेश्वर आश्रमाची धुरा माझ्याकडे सोपवली. तेव्हापासून आजतागायत विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासह अध्यात्मिक संस्कार देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच आदिशक्ती मुक्ताईंच्या प्रेरणातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सुरू आहे. गुरू-शिष्य हे नाते गोडवा देणारे आहे. त्यामुळे मुलांचे भवितव्य कसे घडेल? या दृष्टिकोनातून सातत्याने काम सुरू आहे. गुरूंकडून ज्ञान घेतल्यानंतर शिष्यांनी एकमेकांचा द्वेष करण्याचे टाळावे तसेच स्वप्रसिद्भीपासून दूर राहावे, जेणेकरून आपला विकास आपल्याला साधता येईल. गुरू-शिष्याची ही परंपरा पुढे सुरू ठेवून शिष्यांनी देखील आपले शिष्य उत्कृष्ट कसे होतील याकडे लक्ष केंद्रित करावे असे आवाहन देखील सारंगधर महाराज मेहूणकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. जगदीश पाटील भुसावळ यांनी केले. सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.



