भालोद महाविद्यालयात एक दिवशीय पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती कार्यशाळेचे आयोजन :

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर जी. कोल्हे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. दिनेश पाटील यांनी केले. या कार्यशाळेत प्रा.डॉ. पद्माकर सावळे यांचे ‘अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत: काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी पारंपारिक ऊर्जा स्रोत व अपारंपारिक ऊर्जा स्रोत यांच्यातील फरक विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तसेच अपारंपारिक ऊर्जा स्रोतांचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षण व संवर्धन कसे होते? याबद्दल माहिती दिली. पारंपारिक ऊर्जा स्रोत जसे की लाकुड, कोळसा, कच्चे तेल व नैसर्गिक साधनसामुग्री यांचा अतिवापर केल्यामुळे त्या कालांतराने संपणार आहेत. त्यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची खूप हानी होत आहे. त्याला पर्याय म्हणजेच
अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत होय. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा , जल ऊर्जा, आण्विक ऊर्जा व जैविक ऊर्जा यांचा वापर केल्यास त्यामुळे पर्यावरण संवर्धन व संरक्षण होईल. तसेच हे सर्व निसर्गात मोफत उपलब्ध आहे. या ऊर्जांचा वापरासाठी जगात तंत्रज्ञान विकसित होत आहेत व त्यापासून प्रचंड ऊर्जा निर्माण करण्यात येत असून ऊर्जेची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगितले.
यानंतर प्रा. डॉ. अजय कुमार कोल्हे यांचे ‘ तापमान वाढ कारणे व उपाय’ या विषयांवर व्याख्यान झाले. ते म्हणाले की, नैसर्गिक हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे वातावरण उबदार बनून सरासरी तापमान 15° डिग्री सेंटीग्रेड एवढे राखले जात आहे. मात्र वाढते प्रदूषण,मिथेन वायूचे उत्सर्जन, ऑक्सिजनचा अभाव कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत चाललेले आहे. ते पुढे म्हणाले की, जगाची वाढती लोकसंख्या, सूर्यकिरणांची दाहकता, ज्वालामुखींचे उत्सर्जन व औद्योगिक क्रांती ही जागतिक तापमान वाढीची प्रमुख कारणे आहेत. कार्बन-डाय-ऑक्साइड, सीएफसी व इतर प्रदूषकांचे उत्सर्जन कमी करणे, झाडे लावणे, विजेचा विवेक पूर्ण वापर करणे, पाणी जपून वापरणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आदी उपायोजना करून आपण तापमान वाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
यानंतर प्रा. डॉ. मीनाक्षी वाघुळदे यांचे ‘पर्यावरण संरक्षण व संवर्धनामध्ये जैवविविधतेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. त्यांनी आपले विचार मांडताना पर्यावरणीय घटना जैविक विविधतेमध्ये भिन्न आयाम व समृद्धी जोडतात असे सांगितले. परिसंस्थांमध्ये जटील घटना घडत असतात. त्या सर्व जीवांमध्ये चालू असतात. या घटनांनी पर्यावरण आणि जैवविविधतेतील सजीव व निर्जीव घटकांचा परस्पर संतुलन कायम ठेवले जाते. ही प्रक्रिया कोट्यावधी वर्षांपासून चालू आहे. बऱ्याच प्रजाती उदयास आल्या तर काही प्रजाती नामशेष झाल्या. काळानुसार हवामानातील बदल, प्रजातींमधील स्पर्धा, पृथ्वीवरील उल्का पिंड यामुळे काही प्रजाती नामशेष होत आहेत. मानवी क्रियांमुळे काही प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. मानवी पिढ्यांच्या अस्तित्वासाठी जैवविविधता ही एक काळाची गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे यांनी केला. त्यांनी आपल्या समारोपीय भाषणात पर्यावरण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवून जनजागृती करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. व्ही. पी. पवार यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळकृष्ण चौधरी, किशोर चौधरी, पंकज नेहेते, तुळशीराम पाटील, कल्याण चौधरी व चंद्रकांत लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.