४ ते १० मार्च राष्ट्रीय औदयोगिक सुरक्षितता सप्ताहाच्या निमित्ताने
५३ वा राष्ट्रीय सुरक्षितता दिन /

दिपनगर –
अपघात म्हटले की अंगावर काटा उभा राहतो. कसा झाला असेल ? किती लागले असेल ? वाचला असेल कि नाही ? इ. अनंत प्रश्न क्षणामध्ये मनात निर्माण होतात. मग आपण नशिबाला दोष देतो. देवाची अवकृपा झाली असे म्हणतो. यामुळे अपघात हे होणारच असा नकारात्मक विश्वास आपल्यात निर्माण होऊ लागतो. वस्तुतः अपघात हे कोणाच्या अनवधानाने, नजरचुकीने, यंत्र अथवा यंत्रणा बिघाडाने, मानवी चुकीमुळे, सुरक्षा व्यवस्था व वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे, अज्ञान, अर्धवट ज्ञान, आळशीपणा आणि बेजबाबदार वागण्यामुळे घडतात. हेच सत्य आहे. ते सजग आणि सतर्क राहून तसेच योग्य ती खबरदारी घेतल्यास टाळता येऊ शकतात.
औद्योगिक क्षेत्रातील ,रस्त्यावरील तसेच घरात घडणारे अपघात सध्या मोठी गहन राष्ट्रीय समस्या बनलेली आहे. या अपघातात छोट्या छोट्या चुकांमुळे नाहक बळी संख्या वाढत आहे. दररोज वर्तमान पत्र,सामाजिक माध्यमे आणि दूरचित्रवाणी वरील बातम्या प्रसारित करणाऱ्या वाहिन्यांवरील अपघाताच्या बातम्या वाचून सामान्य माणूस अस्वस्थ होत आहे.
असे हे जिवित हानी व वित्त हानी करणारे अपघात रोखण्यासाठी, त्यावर नियंत्रण आणि उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षितता परिषदेची स्थापना करण्यात आली व त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या पुढाकाराने सन १९६६ पासून स्थापन करण्यात आलेल्या या परिषदेच्यावतीने दरवर्षी ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय सुरक्षितता दिवस म्हणून पाळण्यात येतो. तर ४ मार्च ते १० मार्च या दरम्यान संपूर्ण देशामध्ये सुरक्षितता सप्ताह राबविण्यात येतो.
रा. सु. परिषद वर्षभर नियमितपणे अपघात आणि त्यावरील उपाययोजना यावर कार्य शाळा , चर्चासत्रे, , विविध स्पर्धा आयोजित करीत असते.
साधारणपणे अपघाताचे विद्युत अपघात , रस्ते अपघात , घरगुती अपघात आणि औद्योगिक अपघात या प्रमाणे वर्गिकरण करता येईल.
औद्योगिक अपघात
भारत सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या आकडेवारी नुसार औद्योगिक अपघातांमध्ये साधारणपणे दररोज ३ कामगार मृत्युमुखी पडतात तर ११ कामगार जखमी होतात. सुरक्षितता साधनांचा वापर न करणे, उंचीवरून खाली पडणे, असुरक्षित कृती करणे, असुरक्षित स्थिती, अनुभव आणि प्रशिक्षणाचा अभाव, कामाचा ताण, योग्य परवाना न घेता काम सुरू करणे इ. कारणांनी औद्योगिक अपघात होत असतात.
भारत सरकारच्या “कारखाना अधिनियम १९४८” आणि “महाराष्ट्र कारखाना अधिनियम १९६३” नुसार कामगारांच्या आरोग्य , सुरक्षितता आणि पर्यावरण विषयक संपूर्ण कार्यवाही अधिनियमित करण्यात आलेली आहे. कारखाना मालकाची कर्तव्ये आणि जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. कामगारांचे अधिकार आणि हक्क तसेच त्यांची कर्तव्ये देखील अधोलेखित करण्यात आलेली आहेत. तसेच कारखाना मालकाने जर आपली जबाबदारी टाळली अथवा आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारची कसूर केली तर शिक्षेचे देखील प्रावधान दोन्ही अधिनियमात करण्यात आलेली आहे. कामगारांच्या सुरक्षितते साठी सुरक्षितता अधिकारी, कामगारांच्या कल्याण विषयक प्रश्नांसाठी कल्याण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी वैदयकीय अधिकारी नेमणे बंधनकारक आहे.
कारखान्यात नियमित मॉक ड्रिल घेणे, सुरक्षितता समिती सदस्य यांची नेमणूक करून त्यांच्या नियमित सभा घेणे, कामगारांना प्रशिक्षण देणे, सुरक्षितता साधनांचा पुरवठा करून त्यांचा वापर बंधनकारक करणे आदी उपाय योजना करून औदयोगिक अपघात कमी करता येतात.
आग लागणे, स्फोट होणे, विषारी रसायने किंवा वायु गळती,इमारत किंवा ढाचा कोसळणे इ. कारणांनी मोठे अपघात होत असतात. अशा अपघातांमुळे जिवहानी आणि वित्तहानी मोठया प्रमाणावर तर होतेच पण त्यासोबत हवा , भू आणि जल देखील मोठया प्रमाणावर प्रदुषित होऊन निसर्गाची मोठी हानी होते.
विद्युत प्रवाह अपघात
भारत सरकारच्या नवीन आकडेवारीनुसार (एनसीआरबी) देशात दररोज ३४ व्यक्ती वीजेच्या तीव्र झटक्याने आपला जीव गमावत आहेत. जखमींची तर नोंदच नाही. म्हणजे एखादया महामारी पेक्षाही अधिक लोक वीजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडत आहेत. सदर बाब आपली चिंता वाढवणारी आहे. वीजेच्या धक्क्यामुळे व्यक्ती भाजला जातो. उंचावरून खाली पडतो. प्रसंगी जीवासही मूकतो. हे सर्व अपघात असुरक्षितपणे कार्य करणे, असुरक्षित उपकरणे, असुरक्षित पर्यावरण यामुळे होतात.
घरगुती अपघात
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार घरगुती जे छोटे मोठे अपघात होतात त्यात १०० पैकी १६ व्यक्ती हया कमी जास्त प्रमाणात जखमी होतात. तर १८९० पैकी एका व्यक्तीचा मृत्यू होतो.
घरगुती अपघातामध्ये घसरून पडणे, जिन्यातून किंवा पायऱ्यावरून पडणे,विजेचा शॉक, उंचावरून ( स्टूल, शिडी इ) पडणे, कुकरचा , मोबाईल स्फोट इ. प्रकार आढळतात. असे अपघात रोखण्यासाठी थ्री पिनचा वापर, घराला व्यवस्थित आर्थिंग असणे, दर्जेदार मानांकित वस्तूंचा वापर, गॅस गिझर बाथरूम ऐवजी बाहेर फिट करणे, चार्जिंग सुरू असताना मोबाईलचा वापर टाळणे, वस्तूंसोबत मिळालेल्या सुरक्षितता सूचना पुस्तिकेचे वाचन इ. उपाययोजनांनी घरगुती अपघात टाळणे शक्य आहे.
रस्ते अपघात
भारतात दरवर्षी साधारणपणे चार लाख साठ हजार अपघात रस्त्यांवर होतात; त्यात एक लाख सत्तर हजार व्यक्ती प्राणास मुकतात तर साडे चार लाख व्यक्ती जखमी होतात. जगाचा विचार करता जगामध्ये जेवढे अपघात रस्त्यांवर होतात त्यातील अकरा टक्के अपघात भारतामध्ये होतात. म्हणजे रस्त्यांवरील अपघात आमच्यासाठी किती मोठे संकट आहे. यामुळे किती हानी होत असेल याची कल्पना येऊ शकते.
भारतीय असुरक्षित खड्डेमय रस्ते, रस्त्यांवर वाहतूक दिशा वेग स्थिती दर्शक चिन्हांचा अभाव, वाहतूक नियमांची पायमल्ली, अमर्याद वाहनांमुळे तसेच लहान मुलांच्या हातात वाहने, विना परवाना तसेच अनुभवाची कमी यामुळे रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे.
रस्ते अपघात रोखण्यासाठी हेल्मेटचा वापर सक्तीने करणे, मोबाईलचा वापर न करणे, मदयपान न करणे, घाई टाळणे,वेग मर्यादेवर नियंत्रण , रहदारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन इ. सूचनाचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी महामार्गावरील वाहतूक चिन्हे मुलांना प्रत्यक्ष दाखवून त्यांचे अर्थ आणि त्यांचा वापर कसा करावा याबाबत माहिती दिली.
अपघात झाल्यावर काय करावे? तर सर्वात आधी अपघातग्रस्तांना तातडीने मदत करावी. परिस्थिती बघून त्यांना ताबडतोब रुग्णालयामध्ये न्यावे. बऱ्याचदा अशी मदत केल्याने पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल या भितीमुळे सर्वसामान्य व्यक्ती अपघातग्रस्तांना तातडीने मदत करीत नाहीत. परंतु बऱ्याच अपघाता वेळी असे निदर्शनास आलेले आहे की जर अपघातग्रस्तास वेळेवर मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचला असता. म्हणूनच अशा वेळी आपण सर्व प्रथम त्यांना मदत करून अमूल्य जीव वाचवला पाहीजे.
हिट अँड रन म्हणजे काय?
बऱ्याचदा वाहन चालक त्याच्या हातून अपघात झाला की भितीमुळे किंवा पब्लिक मारापासून स्वतः चा बचाव करण्यासाठी अपघातग्रस्तांना तसेच सोडून पळ काढतो. सदर बाब हिट अँड रन प्रकारात मोडते. असे करणे म्हणजे मोठा गुन्हा ठरविण्यात आला आहे. अशा गुन्हयासाठी जबरी शिक्षेची तरतूद कायदयाने करण्यात आलेली आहे. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी म्हणूनच हा नविन कायदा आलेला आहे.
पतंग मांजा अपघात
सध्या पतंग मांजामुळे देखील अपघात होत आहेत. असा मांजा विक्री आणि वापरावर निर्बंध आणि बंदी आहे. मांजा वापरामुळे गंभीर अपघात होऊन जीवहानी सारखे कटू प्रसंग घडत आहेत . यासाठी आपण सर्वांना स्वयंस्फूर्तीने सजग सतर्क राहून सदर अपघात रोखण्यासाठी कार्य करावे लागणार आहे.
९० टक्के अपघात हे मानवी चुका आणि आमच्या कडून घडणाऱ्या असुरक्षित कृतीतून घडत असतात. तर केवळ १० टक्के अपघात असुरक्षित स्थितीमुळे घडतात. आम्ही जबाबदारीने वागून, सजग आणि सतर्क राहून अपघात टाळू शकतो.
आपत्कालिन टेलिफोन नंबर पोलिस मदत १००, आगीसाठी १०१, ॲम्बुलन्ससाठी १०२, वैद्यकीय सल्ला १०४, आपत्कालिन स्थिती १०८, महिला संकटात सापडली तर १०९१ आणि वरील सर्व संकटासाठी ११२ हा सामायिक क्रमांक आहे. ११२ हा आपात्कालिन नंबर सर्वांनी पाठ केलेला बरा.
अपघातामुळे जिवित हानी, वित्त हानी आणि सामाजिक हानी होते. राष्ट्राचे अपरिमित नुकसान होते. अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करणे आमचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपण सर्व सजग सतर्क आणि जबाबदारीने वागून अपघात मुक्त समाज घडवू या !
—मोहन सरदार
–(मास्टर्स इन सेफ्टी मॅनेजमेंट
सुरक्षितता अधिकारी
भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र
महानिर्मिती कं मर्या. महाराष्ट्र शासन )
मोबाईल नंबर -9422779406







