जळगाव – तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक तुषार लोहार होते. यावेळी पदवीधर शिक्षक डॉ. जगदीश पाटील यांनी मराठी भाषेचे महत्व विशद करून शालेय वयातच मराठीचा पाया भक्कम करण्याचे आवाहन केले. कवयित्री मंजुषा पाठक यांनी आपली स्वरचित बालकविता सादर केली तर गझलकार ज्योती वाघ यांनी गझल सादर केली. विनोद जयकर, सविता निंभोरे व सुनंदा रोझदकर यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांकडून आपापल्या बालभारती पाठ्यपुस्तकातील कविता गायन करून घेतल्या. अमळनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपली कविता सादर केल्याबद्दल मंजुषा पाठक व ज्योती वाघ या दोघा शिक्षिकांचा सत्कार मुख्याध्यापक तुषार लोहार व ज्येष्ठ शिक्षक शंकरलाल साळुंखे यांनी केला. सूत्रसंचालन संतोष वानखेडे यांनी तर आभार राजाराम पाटील यांनी मानले.



